वर्षभरात पोलिसांकडे पाच हजार तक्रारी दाखल
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्य़ांचा टक्का वाढत आहे. घरफोडी, चोरी, साखळीचोरीप्रमाणे सायबर गुन्ह्य़ांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रारींचा ओघ सुरू आहे. यंदाच्या वर्षी नोव्हेंबरअखेरीपर्यंत आर्थिक फसवणूक, समाजमाध्यामांचा वापर करून फसवणूक, गोपनीय माहिती चोरून खात्यातील पैसे लांबविणे, मोबाईलची गोपनीय माहिती चोरून फसवणूक अशा प्रकारच्या पाच हजार १२७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवून गंडा घालणे, समाजमाध्यमांचा वापर करून विवाहाच्या आमिषाने फसवणूक, बँकेतून अधिकारी असल्याची बतावणी करून क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती चोरून फसवणूक करणे अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी ब्रिटिश लॉटरी लागल्याच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले होते. अशा प्रकारे फसवणूक करण्यात नायजेरियन चोरटे वाकबगार आहेत. नायजेरियन चोरटय़ांना अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये अटक करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकच्या माध्यमातून मैत्रीची विनंती पाठवून हर्बल तेल विक्रीत भरपूर नफा मिळतो,असे आमिष दाखवून नायजेरियन चोरटय़ांनी फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी चिंचवड भागातील एका व्यावसायिकाला हर्बल तेल विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्याला एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून याप्रकरणात नवी मुंबईतून दोन नायजेरियन चोरटय़ांना अटक करण्यात आली होती.
यंदाच्या वर्षी सायबर गुन्ह्य़ांमध्ये अडीच पट वाढ झाली आहे.
नोव्हेंबर २०१७ अखेपर्यंत सायबर गुन्हे शाखेकडे पाच हजार १२७ तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये आर्थिक फसवणुकीचे गुन्हे सर्वाधिक आहेत. गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्ह्य़ांच्या अनुषंगाने दाखल होणारे तक्रार अर्ज आणि दाखल गुन्ह्य़ांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण सायबर गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.
सायबर गुन्ह्य़ांत नऊ नायजेरियन अटकेत
सायबर गुन्ह्य़ांत यंदाच्या वर्षी सायबर गुन्हे शाखेकडून वेगवेगळ्या प्रकरणात नऊ नायजेरियन तरुणांना अटक करण्यात आली आहे. नायजेरियन तरूण शिक्षण किंवा वैद्यकीय व्हिसा मिळवून देशात शिरकाव करतात. व्हिसाची मुदत संपल्यानंतर ते देशात बेकायदा वास्तव्य करतात. फेसबुकवर एखाद्या तरुणीचे छायाचित्र टाकून बनावट खाते तयार केले जाते. बनावट खात्यांचा वापर करून विवाहाचे आमिष तसेच व्यवसायाचे आमिष दाखविले जाते. मध्यंतरी नायजेरियन चोरटय़ांनी फसवणुकीसाठी केरळमधील चोरटय़ांचा बँकखात्यांचा वापर केला होता.
फसवणूक अशी टाळा
अनोळखी व्यक्तीला तुमच्या बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नका, असे आवाहन बँकांकडून खातेदारांना वेळोवेळी करण्यात येते. तरीदेखील अनेकजण बँक अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या चोरटय़ांच्या संभाषणाला बळी पडतात. फेसबुकवर अनोळखी व्यक्तीने मैत्रीची विनंती पाठविल्यास त्याला फारसा प्रतिसाद देऊ नका. एटीएम केंद्रात पैसे काढण्यास गेल्यास एटीएम यंत्रांची तपासणी करा. एटीएम यंत्रात स्किमर नावाची यंत्रणा चोरटय़ांकडून बसवण्यात आलेली असते. त्यामुळे तुमच्या कार्डची गोपनीय माहिती चोरली जाते. त्याद्वारे बनावट एटीएम कार्ड तयार करून (क्लोनिंग) केले जातात. अशा प्रकारची यंत्रणा आढळल्यास तातडीने याबाबतची माहिती एटीएम केंद्राबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकास द्यावी. सुरक्षारक्षक नसल्यास तेथील नोंदवहीत तक्रार नोंदवावी. एटीएम केंद्रात मागे थांबलेल्या व्यक्तीपासून सावध रहा. कारण मदतीच्या बहाण्याने बऱ्याचदा एटीएम कार्ड चोरले जाते. त्यानंतर गोपनीय क्रमाकांचा गैरवापर करून खात्यातून पैसे काढले जातात. याशिवाय एटीएममध्ये व्यक्ती पैसे काढत असताना काही कारणानिमित्त आत घुसणाऱ्या व्यक्तींना अटकाव केला पाहिजे.
