पुणे : अर्धवेळ नोकरीचे आमिष, मनी लॉड्रींग प्रकरणामध्ये अटकेची भीती दाखवून आणि शेअर बाजारात नफ्याचे आमिष अशा वेगवेगळ्या कारणांनी घडलेल्या तीन घटनांमध्ये सायबर चोरट्यांकडून तिघांना मिळून ४० लाख रुपयांना गंडा घातला आहे.
अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने साबयर चोरट्यांनी एका तरूणीला तब्बल १० लाख ६ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. १५ ऑक्टोबर २०२४ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत बंडगार्डन परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी २८ वर्षीय तरूणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी बंडगार्डन परिसरात राहायला असून, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना मेसेज करून अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी विश्वास संपादन करून तरुणीला रक्कम वर्ग करण्यास सांगितले. नोकरी मिळेल, या आशेवर तरूणीने सुरूवातीला काही रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात वर्ग केली. तब्बल १० लाख ६ हजारांची रक्कम वर्ग केल्यानंतरही त्यांना नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधिताला रक्कम पुन्हा मागितली असता, त्यांचा संपर्क बंद झाला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव तपास करीत आहेत.
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १५ लाख १० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १३ जुलै ते २० सप्टेंबर कालावधीत बिबवेवाडी येथे घडली. या प्रकरणी ७५ वर्षीय नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे तपास करीत आहेत.
अटकेची भीती दाखवून १४ लाखांचा ऑनलाईन गंडा
टेलिकम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एका महिलेला जाळ्यात अडकविले. त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल असल्याचे सांगत अटकेची भीती दाखवून तब्बल १४ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १२ ते २० सप्टेंबर कालावधीत वडगावशेरीत घडली. याप्रकरणी ५५ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगावशेरी परिसरात राहायला असून, १२ सप्टेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. टेलिकम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करीत त्यांचा मोबाइल क्रमांक मनी लॉड्रींगसह इतर चुकीच्या कामासाठी वापरला गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल असून, अटक करण्याची भीती दाखविण्यात आली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांचे बँक खाते तपासणीसाठी ऑनलाईनरित्या ताब्यात घेत असल्याचे सांगून रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करीत आहेत.
