पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला असल्याने शरद पवार गटाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट तरुणांपर्यंत कसा पोहोचेल याची काळजी घेतली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवार गट सायकल दौरा करत कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पोहोचून तरुणांपर्यंत शरद पवार यांचे विचार पोहोचवण्याचे सध्या काम करत आहेत. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल दौरा राबविण्यात आला आहे.

पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे. हे कदापि नाकारता येऊ शकत नाही. गेली पाच वर्ष भाजपाने पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर सत्ता काबीज केली. यामुळे अजित पवार हे काही प्रमाणात अस्वस्थ झाले होते. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे त्यांच्या सभांमधून बोलून देखील दाखवली. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजपासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि पिंपरी- चिंचवड पुन्हा एकदा अजित पवारांना मिळालं असं बोललं जात आहे. परंतु, राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने शहरातील शरद पवार गटाने देखील शुड्डू ठोकला असून शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा-“आत्मक्लेश करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाणांच्या छायाचित्रासमोर बसा!”, रोहित पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवार गटाने सायकल दौरा आयोजित केला, याद्वारे ते महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये जात तरुणांमध्ये शरद पवार यांचे विचार पोहोचवण्याचे काम करत आहेत. यामुळे शरद पवार गटाला काही प्रमाणात का होईना सहानुभूती भेटण्याची शक्यता आहे. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना घेऊन शरद पवार हे पुन्हा राष्ट्रवादीचा पक्ष उभा करत आहेत. यात विद्यार्थ्यांचा देखील मोठा सहभाग असला पाहिजे असं मत शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी व्यक्त केले. शरद पवार यांचं शहरातील शिक्षणासंदर्भात मोठे योगदान आहे. त्यांनी पिंपरी- चिंचवड शहराचा चेहरा बदलण्याचं काम केलं. नव्या पिढीला ऊर्जा देण्याचं काम केलं. त्यामुळे नव्या पिढीने शरद पवार यांना समजून घेतल्यास ते आगामी काळात कधीही संकटांना घाबरणार नाहीत अस मत शरद पवार गटाचे विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व्यक्त केले.