पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळी चूल मांडल्यावर शरद पवार यांचे छायाचित्र लावता येत नाही म्हणून ते यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावत आहेत. हे म्हणजे आधी चुका करायच्या आणि मग आत्मक्लेश करण्यासाठी समाधिस्थळावर जाऊन बसायचे असे सुरू झाले आहे. मात्र, आता आत्मक्लेश करण्यासाठी कराडला समाधीस्थळावर जाण्याची गरज नसून, चव्हाण यांच्या छायाचित्रासमोर बसले तरी चालेल, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी ही टीका केली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील राजकारण नेहमीच शरद पवार यांनी घडवले. नुसते घडवले नाही तर वेळ प्रसंगी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. अशा वेळी पवार हे हुकुमशाही पद्धतीने काम करतात अशी होणारी टीका अशोभनीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळी चूल मांडल्यावर शरद पवार यांचे छायाचित्र लावता येत नाही म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावत आहेत. आता आत्मक्लेश करण्यासाठी चव्हाण यांच्या छायाचित्रासमोर बसले तरी चालेल.
शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांना गुरू मानत आणि आजही त्यांच्याच प्रेरणेने धडाडीने कार्य करत आहेत. ते त्यांचे स्फूर्तीस्थान आहे. ज्या कार्यकर्त्यांना १८ वर्षे मंत्रिपद दिले तेच आता वडिलांना घराबाहेर काढू पहात आहेत. शरद पवार यांनी आजपर्यंत कार्यकर्त्यांना मंत्रिपद, अधिकारापासून भरभरून दिले. कधीही कुणाच्या कामात हस्तक्षेप केला नाही. केवळ स्वार्थापोटी आज तेच कार्यकर्ते विरोधी गटात जाऊन बसले आहेत, असेही रोहित पवार म्हणाले. सध्या आताच निर्णय घेऊ असे कधी म्हटले जात नाही. पुन्हा कधी तरी बघू अशी अश्वासने दिली जातात. सध्याचे सरकार फक्त स्वतःचाच विचार करत आहे, अशीही टीका रोहित पवार यांनी केली.