अरबी समुद्रात चक्रिय स्थिती; हवामानावर परिणाम

पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. शनिवारपासून पुढील चार ते पाच दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन गारवा कमी होणार आहे.

समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिणेकडील अनेक भागांत गेल्या काही दिवसांत मोठा पाऊस झाला. दक्षिणेकडील भागांत अद्यापही कमी दाबाचे क्षेत्र आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. त्याचप्रमाणे अंदमानच्या समुद्रात १३ नोव्हेंबरला नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार आहे. दिवाळीच्या कालावधीतही राज्याच्या याच भागांत पावसाळी वातावरण होते. काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली होती.

हवाभान…

राज्यात पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. काही भागात कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे किमान तापमानात घट होऊन सध्या थंडी अवतरली आहे. मात्र, ढगाळ वातावरणानंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. १३ नोव्हेंबरपासून कोकण विभागाच्या प्रामुख्याने दक्षिण भागात, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

विदर्भ वगळता…

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी १३ नोव्हेंबरपासून पावसाचा अंदाज आहे. रायगड, पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर आदी भागांत १४ नोव्हेंबरपासून काही ठिकाणी पाऊस होईल. ठाणे जिल्ह्यात तुरळक भागांत १५ नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात मात्र सर्वच भागांत हवामान कोरडे राहणार आहे.