लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणरायाची प्रतिष्ठापना मंगळवारी (१९ सप्टेंबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी करण्यात येणार आहे, तर ट्रस्टने साकारलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीवरील रोषणाईचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी शनिवारी ही माहिती दिली. ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-गणेशोत्सवात पुणेकरांना मिळणार पावसाचे दररोज विशेष अंदाज; जाणून घ्या कसे?

मंगळवारी प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेआठला मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून गणरायाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आला असून, श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर लावण्यात येणार आहेत. उत्सव मंडपात प्रतिष्ठापनेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. सजावटीच्या उद्घाटनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याशी या विषयी बोलणे झाले असून, शनिवारी अथवा रविवारपर्यंत त्यांचा निर्णय कळवला जाईल. मंगळवारी सायंकाळी सातला या सजावटीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल, असे या वेळी सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा असेल यंदाचा गणेशोत्सव

  • ऋषीपंचमीच्या (२० सप्टेंबर) पहाटे सहाला ३१ हजार महिलांचे अथर्वशीर्षपठण
  • बुधवारी (२० सप्टेंबर) रात्री दहा ते पहाटे तीनपर्यंत वारकरी मंडळातर्फे ‘हरिजागर’
  • उत्सव मंडपात रोजचे अभिषेक आणि सामूहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन
  • जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत तीन ठिकाणी केंद्र आणि रुग्णवाहिका सेवा
  • गणेशभक्तांसाठी ५० कोटी रुपयांचा विमा
  • उत्सवावर तब्बल १५० कॅमेऱ्यांचे लक्ष
  • पाच एलईडी पडद्यांची सोय
  • ऑनलाइन दर्शनाची सुविधा