पुणे : दस्तकारी हाट क्राफ्ट बाजार यंदा पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटी कार्यक्रम यांच्या सहकार्याने नव्याने साकारलेल्या सिंहगड रस्त्यावरील कलाग्राममध्ये भरविण्यात येणार आहे. हा क्राफ्ट बाजार ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरदरम्यान सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे. या बाजारात देशभरातील कारागीर त्यांच्या १२० पेक्षा अधिक दालनांमधून कला, हस्तकला आणि वस्त्रनिर्मितीतील कौशल्याचे दर्शन घडविणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन ३० ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम तसेच अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे उपस्थित राहणार आहेत. दस्तकारी हाट समितीच्या अध्यक्षा जया जेटली, प्रकल्प प्रमुख चारू वर्मा या वेळी उपस्थित असतील. या बाजारात नामांकित कारागीर सहभागी होणार आहेत. त्यात चन्नपटणा खेळणी तयार करणारे मिनू जोशी, ज्यूट व कापडावर कांथा भरतकाम करणाऱ्या झुमकी अय्यंगर, कोसा सिल्क साडी व कापड तयार करणारे प्रवीण बडवे, बंजारा भरतकाम करणारे रोहित शंकर राठोड, कोल्हापुरी चप्पल तयार करणारे संतोष विजय मोरे, घोंगडी आणि गोधडी तयार करणारे नीराज व्ही. बोराटे यांचा समावेश आहे.

या वर्षीच्या बाजारात ३० पेक्षा जास्त हस्तकला, कला आणि वस्त्रप्रदर्शने पाहायला मिळणार आहेत. यासोबतच भेट देणाऱ्यांसाठी कौशल्य प्रात्यक्षिके आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील. कार्यक्रमात मनोरंजनासाठी पश्चिम बंगालचे छऊ नृत्य आणि राजस्थानचे मंगनियार गायक कला सादर करणार आहेत. तसेच राजस्थान, पश्चिम बंगाल आणि जुन्या दिल्लीच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे.

दस्तकारी हाट क्राफ्ट बाजार

– स्थळ: कलाग्राम, सिंहगड रस्ता

– कालावधी : ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२५

– वेळ: सकाळी ११ ते रात्री ८