Dattatray Bharne on Pune Shaniwar Wada Namaz Row : पुणे शहरातील शनिवारवाड्यात दोन दिवसांपूर्वी काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर कुलकर्णी यांनी रविवारी (१९ ऑक्टोबर) दुपारी काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शनिवारवाड्यात प्रवेश केला. मुस्लिम महिलांनी शनिवारवाड्याच्या आवारात जिथे नमाज पठण केलं होतं त्या जागेवर गोमूत्र शिंपडलं आणि ती जागा शेणाने सारवून घेतली. तसेच त्यांनी शनिवारवाडा परिसरातील मजार काढून टाकण्याची मागणी केली.

या घटनेनंतर शनिवारवाडा परिसरात तणाव निर्माण झाला आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका केली आहे. पाठोपाठ त्यांच्याच मित्रपक्षांनी देखील या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच त्या पुण्यातील सामाजिक सलोखा बिघडवत असल्याचा आरोप केला आहे.

दत्तात्रय भरणेंकडून राष्ट्रवादीती भूमिका स्पष्ट

दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी शनिवारवाड्यातील नमाज पठणाच्या घटनेवर आणि त्यावरील भाजपाच्या प्रतिक्रियेवर भाष्य केलं आहे. यासह त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदू-मुस्लीम भाई-भाई अशी टिप्पणी भरणे यांनी केली आहे. “सर्वांचं रक्त लाल आहे”, असंही ते म्हणाले. टेंभुर्णी येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भरणे म्हणाले, “आपल्याला मुस्लीम समाजाला घेऊन पुढे जावं लागेल. सर्वांनी हाच मंत्र पाळावा आणि मुस्लिमांना घेऊन पुढे चाला.”

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “मुस्लीम समाजाबाबात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोखठोख भूमिका राहिली आहे. जेव्हा असे विषय येतात तेव्हा अजित पवार यांचं एकच वाक्य असतं की आपण सगळे एक आहोत. हिंद-मुस्लीम भाई-भाई आहोत. शेवटी सगळ्यांचं रक्त लाल आहे. त्यामुळे विनाकारण भेदभाव करणं बरोबर नाही. याअगोदर जेव्हा जेव्हा राज्यात कोणी मुस्लीम समाजाविरोधात भूमिका घेतली आहे तेव्हा प्रत्येक वेळी, प्रत्येकाविरोधात अजित पवार यांनी भूमिका घेतली आहे. मुस्लिमांना विरोध करणाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.