पुणे : घोले रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वसतिगृहात राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कावीळ आणि डेंग्यूची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला असून, महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीमुळे विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह महापालिकेच्या अखत्यारीत आहे. वसतिगृहात झालेल्या दुरवस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थिसेनेचे प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वसतिगृहाची इमारत पन्नास वर्षे जुनी झाली आहे. वसतिगृहाशेजारीच महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. वसतिगृहात घाणीचे साम्राज्य, अस्वच्छ पाणी, डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आजारी पडत आहेत. या विद्यार्थ्यांवर मोफत उपचार झाले पाहिजेत. तसेच मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तातडीने आर्थिक मदत मिळण्याची मागणी कनोजिया यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

हेही वाचा – शंभरी गाठलेल्या टोमॅटोच्या दरात मोठी घट, किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलो

विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवारी आंदोलन केले. वसतिगृह प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतरही वसतिगृहात अस्वच्छता आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या घटनेस महापालिका आणि वसतिगृह प्रशासन जबाबदार आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबास नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अभाविपचे पुणे महानगरमंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी महापालिका उपायुक्त नितीन उदास यांच्याकडे केली.

हेही वाचा – पिंपरी : ‘रेडझोन’चा आता अचूक नकाशा, सीमेबाबतचा संभ्रम दूर होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसतिगृहातील समस्यांच्या तक्रारींची दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वसतिगृहाला भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, मागण्या जाणून घेतल्या. वसतिगृहात स्वच्छता राखण्यासाठी, स्वच्छतेसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याच्या, विद्यार्थ्यांच्या अडचणी, तक्रारींची नोंद नियमितपणे घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. वसतिगृहातील स्वच्छतेचे काम या पूर्वीच सुरू करण्यात आले आहे, असे महापालिकेचे समाजकल्याण उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले.