पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे ते मुंबई लोहमार्गावर सोमवारी सकाळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने डेक्कन क्वीनसह इतर चार एक्सप्रेस आणि लोकल गाडीची सेवा विस्कळीत झाली. हा बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात आला, तरी या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या सुमारे दीड ते दोन तास उशिराने धावल्या. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, कार्यालयीन कामकाजासाठी जाणाऱ्यांना; तसेच विद्यार्थ्यांना याचा फटका बसला.
पुणे रेल्वे स्थानकावरून नियमित वेळेनुसार, सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी डेक्कन क्वीन नियमित वेळेत मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. मात्र, मळवली येथील लोहमार्गावर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे स्वयंचलित प्रणालीत दिसले. लोकोपायलटने गाडी थांबवून तांत्रिक व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. अर्धा तास ‘डेक्कन क्वीन’ एकाच ठिकाणी थांबून होती. त्यामुळे मागून येणारी पुणे लोणावळा लोकलसह (९९८१०) लांब पल्ल्याच्या प्रगती एक्सप्रेस (१२१२६), इंदूर-हमसफर एक्सप्रेस ( ९९८१०), चेन्नई एक्सप्रेस (२२१६०) या गाड्या थांबविण्यात आल्या.
तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर डेक्कन क्वीन मळवली येथू मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. ही गाडी जवळपास ४० मिनिटे उशिरा मुंबईत पोहचली. मात्र, मागून येणाऱ्या गाड्यांवर याचा मोठा परिणाम जाणवला. काही गाड्या एक तास दीड तास दोन तास उशिराने धावल्या.
मळवली येथील लोहमार्गाच्या एका ‘पाॅइंट’वर (वळणावरील रुळ जोडणीचे ठिकाण) तांत्रिक बिघाड निर्माण झाला असल्याचे स्वयंचलित प्रणालीच्या माध्यमातून समोर आले. त्यामुळे ‘डेक्कन क्वीन’ तातडीने थांबविण्यात आली. अभियांत्रिकी विभागाकडून दुरुस्ती करून गाडी मार्गस्थ करण्यात आली. दुरुस्ती होईपर्यंत वेळापत्रकानुसार या मार्गावरून धावणाऱ्या गाड्या थांबवून ठेवाव्या लागल्या. प्रवाशांना झालेल्या विलंबाबद्दल खेद आहे. – हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे विभाग, पुणे