पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पिंपळे निलख, चऱ्होली आणि भोसरी एमआयडीसीत अग्निशामक केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपळे निलख, चऱ्होलीतील केंद्रासाठी भूसंपादनाची कारवाई सुरू आहे, तर एमआयडीसीमधील केंद्रासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने विस्तार होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशामक विभागाने शहरातील विविध भागांमध्ये नव्या केंद्रांची उभारणी, तसेच नियोजन सुरू केले आहे. सध्या एकूण १० अग्निशामक केंद्रे कार्यरत आहेत. त्यामध्ये पिंपरी येथील मुख्य अग्निशामक केंद्र, भोसरी उपअग्निशामक केंद्र, मोशी, चिखली, तळवडे, रहाटणी, थेरगाव, प्राधिकरण, चोविसावाडी आणि नेहरूनगर उपअग्निशामक केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांमधून शहराच्या विविध भागांमध्ये चोवीस तास सेवा देण्यात येते. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे प्रतिसाद वेळ कमी करणे, शहराच्या प्रत्येक भागात अग्निशामक सेवा पोहोचवणे, मोठ्या औद्योगिक वसाहतींसाठी विशेष सुविधा निर्माण करणे, रहिवासी वस्त्यांमध्ये, नव्या गृहनिर्माण इमारतींमध्ये तत्काळ मदत देणे या अनुषंगाने आणखी अग्निशामक केंद्रे बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या पुनावळे, दिघी, निगडी-प्राधिकरण, पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालय या ठिकाणी सशक्तता वाढवण्यासाठी या अग्निशामक केंद्रांचे बांधकाम सुरू आहे.

‘नव्याने तीन अग्निशामक केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पिंपळे निलख येथील संरक्षण खात्याचीही जागा घेण्याचा प्रयत्न केले जात आहेत. नगररचना आणि ई क्षेत्रीय कार्यालयामार्फत चऱ्होली, वर्ल्ड प्राइड सिटी परिसरातील अग्निशामक केंद्रांसाठी भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. भोसरी येथील एमआयडीसीमधील अग्निशामक केंद्रासाठी बांधकामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रतिसाद वेळ महत्त्वाचा असतो. या केंद्रांमुळे मनुष्यहानी आणि वित्तहानी टाळता येईल,’ असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, प्रत्येक प्रभागात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. नव्या अग्निशामक केंद्रांमुळे मदतीचा वेळ कमी होईल. नागरिकांचा जीव व मालमत्तेचा अधिक चांगल्या पद्धतीने बचाव करता येईल.- शेखर सिंह,आयुक्त पिंपरी-चिंचवड महापालिका