पुणे : ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक कार्यकारिणीला दिला आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तसा अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आगामी निवडणुकीतील महाविकास आघाडीसंदर्भात भाष्य केले. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची समिती स्थापन करा आणि प्राथमिक स्वरूपात चांगल्या उमेदवारांची यादी महिन्याभरात द्या. त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे आणि प्रदेश सरचिटणीसपदी आमदार रोहित पवार यांची निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापूसाहेब पठारे, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, श्रीकांत पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यावेळी उपस्थित होते.
महापालिकेसाठी सत्ताधारी पक्षाने प्रभाग रचना बदलली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीबाबतचा निर्णय शेवटच्या क्षणी झाला. त्यामुळे काही उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची, की नाही, याचा निर्णय प्रदेश स्तरावर होईल. मात्र, तो लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली होती. हा धागा पकडून शशिकांत शिंदे यांनी तसे अधिकार स्थानिक पातळीवर देत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, रोहित पवार यांनीही कार्यकर्त्यांना ताकदीने काम करण्याची सूचना केली. ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभा निवडणुकीत हवा गेल्याने पराभव स्वीकारावा लागला. लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत सर्वच कमी पडले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लोकांचे प्रश्न घेऊन पुढे जावे लागले. लोकांची कामे करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले, तर नेते त्यांच्या मागे उभे राहतील. आत्ताची वेळ संघर्षाची आहे. ऐनवेळी पक्षाला सोडून जाणार असाल, तर राजकारणात आलाच कशाला, असे विचारावे लागेल. मात्र, सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील. कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल.’