पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या प्रवेश अर्जांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास चार हजारांनी अर्ज कमी आले असून, यंदा ७८ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १४ हजार ४४२ अर्ज आले आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदविका, पदवी, पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते.

यंदा पदवी आणि एकात्मिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा झाली आहे. त्यातील गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. तसेच दहावी आणि बारावीनंतरच्या प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे. विद्यापीठातील ७८ अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता दोन हजार ७९५ आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत ८ जुलैला संपली. गेल्या वर्षी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १८ हजार दोनशेहून अधिक अर्ज आले होते. मात्र यंदा अर्जसंख्येत घट झाल्याचे चित्र आहे. अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा २२ ते २४ जुलै दरम्यान होणार असल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे : विद्यापीठाकडून ३१ जुलैपूर्वी निकाल; जाहीर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

विद्यापीठातील ७८ पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील २५ पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठीचा प्रतिसाद घटता असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी ३३४ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. काही शैक्षणिक विभागांमधील अभ्यासक्रमांना प्रवेशक्षमतेपेक्षाही कमी अर्ज आले आहेत. रसायनशास्त्र पदव्युत्तर पदवीसाठी दोन हजार ६३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल सूक्ष्मजीवशास्त्र पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी एक हजार १५३, तर संगणकशास्त्र पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशासाठी एक हजार ३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तसेच संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा काही अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती असल्याचे दिसून येते.

दरम्यान, विद्यापीठातील नियमित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कायम आहे. मात्र काही अभ्यासक्रम नवीन असल्याने, पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा वेगळे असल्याने त्यांना प्रतिसाद कमी आहे. पदव्युत्तर पदवी प्रवेशांसाठी मुदतवाढ देण्याचा विचार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.