पुणे : राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. यंदा २३ हजार १० शाळांतील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र दहावीच्या विद्यार्थी नोंदणीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. बारावीप्रमाणेच दहावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर नेताना जीपीएस ट्रॅकिंग केले जाईल, प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करतानाही चित्रीकरण करण्यात येईल. गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत परीक्षा केंद्रांवर काटेकोर बंदोबस्त ठेवला जाईल, भरारी पथके-बैठी पथके परीक्षा केंद्रावर असतील. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत ६१ हजार विद्यार्थी कमी झाले आहेत.

हेही वाचा – कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होणार; व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची यादृच्छिक तपासणी

गोसावी म्हणाले, की सीबीएससई, आयसीएसई आदी शाळा वाढणे, या वयोगटातील मुलांमध्ये घट अशी कारणे असू शकतात. यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होईल. बारावीप्रमाणेच दहावीला वाढीव दहा मिनिटे मिळतील. पालक, विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमातील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. मंडळाने प्रसिद्ध केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावे. परीक्षा महत्त्वाची असली, तरी ती सर्वस्व नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नैराश्य येऊ नये म्हणून समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, असे गोसावी यांनी सांगितले.

हेही वाचा – म्हाळुंगे माण नगर रचना योजनेच्या फेरबदलाची सुनावणी आजपासून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारावीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत मंडळाची दिलगिरी

इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकांबाबत मंडळ दिलगीर आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा घटकांमध्ये मंडळाच्या विश्वासार्हतेला बाधा येऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांना न्याय देण्याची दक्षता घेतली जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.