शहरातील तापमानात घट; पहाटे धुक्याची चादर
पाऊस यंदा महिनाभर लांबला आणि थंडीचे काही दिवस घेऊन गेला. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरातही थंडीची चाहूल लागण्यास विलंब झाला. मात्र, सध्या शहरात रात्रीच्या किमान तापमानात घट नोंदविली जात आहे. त्यामुळे संध्याकाळनंतर मध्य भागासह उपनगरांत गारवा जाणवतो आहे. पहाटे बहुतांश ठिकाणी धुक्याची चादर दिसत आहे. या आठवडय़ात तापमानात किंचित चढ-उतार होणार असले, तरी दिवस आणि रात्रीचे तापमान सरासरीच्या आसपास राहणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
जूनमध्ये मोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला, पण पावसाला विलंब झाला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये शहरात पुरेपूर आणि विक्रमी पाऊस बरसला. सप्टेंबरअखेर हंगाम संपला आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात मोसमी वारे देशातून परतले. मात्र, त्यानंतरही अवकाळी पावसाने अनेकदा शहराला झोडपून काढले. अगदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ातही पावसाची हजेरी होती. त्यामुळे विक्रमी पाऊस नंतर वैतागाच्या दिशेने गेला. लांबलेल्या या पावसाने नोव्हेंबरमधील थंडीचे काही दिवस घेतले. परंतु, आता शहराला थंडीची चाहूल लागली आहे.
हिमालयातील हिमवृष्टी आणि उत्तर भारतातील राज्यांत घटलेल्या तापमानानंतर त्या भागातून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहू लागले आहेत. परिणामी राज्याच्या बहुतांश भागातील किमान तापमानात घट होत आहे.
पुणे शहर आणि परिसरामध्येही तापमानात घट झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत ढगाळ हवामानाची स्थिती असल्याने तापमानात वाढ झाली होती. सध्या आकाशाची स्थिती निरभ्र झाल्याने पुन्हा किमान आणि कमाल तापमानात घट होत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका काहीसा कमी होण्यासह रात्री गारव्याचा अनुभव मिळतो आहे. सोमवारी शहरात १६.२ अंश सेल्सिअस किमान, तर ३०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत १.९ अंशांनी अधिक होते.
हवामानाची स्थिती कशी राहणार?
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस म्हणजे १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत शहर आणि परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. त्याचा परिणाम म्हणून रात्रीच्या किमान तापमानात घट होणार आहे. किमान तापमान सुमारे १६ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान ३० ते ३१ अंशांपर्यंत असेल. २२ आणि २३ नोव्हेंबरला आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात १ ते २ अंशांची वाढ होऊ शकते. मात्र, त्यानंतर २३ नोव्हेंबरपासून पुन्हा निरभ्र आकाशाची स्थिती राहणार असल्याने तापमानात घट होईल.
पाषाणची हवा सर्वात थंड!
शहर आणि परिसरात सध्या तापमानात चढ-उतार दिसून येत आहेत. त्यात पाषाणची हवा सध्या सर्वात थंड असून, लोहगावमधील तापमानात वाढ दिसून येत आहे. सोमवारी शिवाजीनगरमध्ये १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. लोहगावचे किमान तापमान १७.३ अंश होते. पाषणमध्ये मात्र १५.८ अंश किमान तापमानाची नोंद झाली.
