पुणे : देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल आणि सैन्याची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. पुण्यातील ‘५१२ आर्मी बेस वर्कशॉप’ने ‘आर्म्ड रिकव्हरी व्हेईकल (एआरव्ही) व्हीटी-७२बी’ या वाहनाची प्रायोगिक तत्त्वावर नूतनीकरण पूर्ण करण्यात आली. ‘एआरव्ही’चा वापर युद्धभूमीवर रणगाडे, शस्त्रास्त्र वाहून नेणाऱ्या वाहनांची दुरुस्ती अशा कामांसाठी केला जातो. दीर्घ काळापासून सेवा बजावत असलेल्या या वाहनांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी नूतनीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
‘प्रोजेक्ट लोटस’अंतर्गत पुनर्बांधणी करण्यात आलेल्या ‘एआरव्ही व्हीटी-७२बी’ या वाहनाचे औपचारिक उद्घाटन लष्करी शैलीत झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. मास्टर जनरल सस्टेनेन्स लेफ्टनंट जनरल अमरदीपसिंह औजला यांनी या वाहनाची पाहणी करून हिरवा झेंडा दाखवला. वरिष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल जे. एस. सिदाना, कमांडर बेस वर्कशॉप ग्रुप मेजर जनरल ललित कपूर या वेळी उपस्थित होते. वाहनांच्या नूतनीकरणासाठीच्या ‘प्रोजेक्ट लोटस’मुळे परकीय आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकणार आहे.
‘‘एआरव्ही व्हीटी-७२बी’ची पुनर्बांधणी ही स्थानिक तांत्रिक क्षमता आणि समर्पणाचे उदाहरण आहे. या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने लष्कराचे पाऊल पडले आहे,’ असे लेफ्टनंट जनरल औजला यांनी सांगितले. तर ‘लढाऊ प्रणाली सदैव सज्ज राहाव्यात यासाठी ईएमई दल कटिबद्ध आहे. जुन्या झालेल्या वाहनांना नवीन आयुष्य देण्याची ही प्रक्रिया सैन्याच्या दीर्घकालीन क्षमतांना बळकट करणारी आहे,’ असे लेफ्टनंट जनरल जे. एस. सिदाना यांनी नमूद केले.