पुणे : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिल्लीतील वायू प्रदूषणासंदर्भात अभ्यास करण्यात आला. हवा गुणवत्ता (एअर क्वालिटी इंडेक्स) निर्देशांक जास्त असण्याचा हवा जास्त विषकारक असण्याशी दर वेळी संबंध असतोच असे नाही, तसेच दिल्लीतील हवेतील सूक्ष्म धूलिकणांमध्ये असलेल्या अपायकारक घटकांचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

संशोधनात अतार सिंग पिपाल, सचिन घुडे, पी. जी. सत्संगी, मिलिंदकुमार भटकर, अक्षय काळे, संदीप निवडांगे, एम. नागेश्वर राव, अर्काबानी मुखर्जी, आकाश विसपुते, हरदीप शर्मा, विकाश कुमार, प्रसन्न लोणकर, प्रमोद कोरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा सहभाग होता. या संशोधनाचा शोधनिबंध ‘ॲटमॉस्फेरिक एन्व्हायर्नमेंट’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला.

या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी ऑक्सिडेटिव्ह पोटेन्शियल या निकषावर सूक्ष्म धूलिकणांचे (पीएम१, पीएम २.५, पीएम१०) विश्लेषण केले. त्यात या सूक्ष्म धूलिकणांमध्ये रासायनिक घटक असल्याचे, प्रदूषणाचे रासायनिक स्वरूप आणि त्यांचे स्रोत यांचा विषारीपणावर परिणाम होत असल्याचे, सर्व सूक्ष्म धूलिकण हानिकारक नसले, तरी वाहने आणि उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे निर्माण होणारे धूलिकण हे वातावरणात तयार होणाऱ्या अन्य कणांपेक्षा जास्त धोका निर्माण करीत असल्याचे आढळून आले.

दिल्लीतील प्रदूषण प्रामुख्याने हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे संशोधनात हवेतील सूक्ष्म धूलिकणांतील घटकांचे विश्लेषण करण्यात आले. त्यात धूलिकणांमध्ये विषारी घटक असल्याचे आढळले. तसेच, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक जास्त असण्याचा धूलिकणांतील विषारी गुणधर्म जास्त असण्याशी संबंध नसल्याचेही दिसून आले. कारण, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक कमी असला, तरी धूलिकणांमधील विषकारकता जास्त असू शकते.

धूलिकणांतील विषारी घटकांचा फुफ्फुसांवर परिणाम होऊन ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच, या संशोधनाच्या पलीकडे वैद्यकीय विदाचा वापर करून अधिक सखोल अभ्यास केल्यास त्यातून प्रदूषण आणि आरोग्य यातील संबंध नेमकेपणाने स्पष्ट होईल,’ अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

केवळ प्रदूषणाचे प्रमाण मोजण्याऐवजी धूलिकण किती हानिकारक आहेत हे समजून घेण्यासाठी ऑक्सिडेटिव्ह पोटेन्शिअल ही पद्धत वापरण्यात आली. त्यातून हवेत असलेल्या रासायनिक संरचनेचा आणि प्रदूषणाचा स्रोतांचा विषारीपणावर मोठा प्रभाव पडतो. कोणते प्रदूषण सर्वांत हानिकारक आहे हे समजून घेण्यासाठी, तसेच हवेची गुणवत्ता खराब असलेल्या शहरांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणाबाबत सुधारणा घडवून आणण्यासाठी हे संशोधन उपयुक्त आहे. – डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ