नवरात्रोत्सवात अनेक जण भक्तिभावाने उपवास करतात. उपवासासाठी लागणाऱ्या भाज्यांच्या विशेषत: भेंडी, बटाटा, राजगिऱ्याच्या मागणीत वाढ झाली आहे. राजगिऱ्याची गड्डी स्वस्त असली, तरी भेंडी आणि बटाटय़ाच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो भेंडीची १२० ते १४० रुपये किलो या दराने विक्री केली जात आहे. गेल्या महिनाभरापासून बटाटय़ाचे दर तेजीत असून बटाटय़ाची विक्री ६० रुपये किलो या दराने केली जात आहे.

नवरात्रोत्सवात रताळ्यांची मुबलक आवक होत आहे. किरकोळ बाजारात एक किलो रताळ्यांची प्रतवारीनुसार ६० ते ८० रुपये दराने विक्री केली जात आहे. राजगिऱ्याच्या एका गड्डीची विक्री १२ ते १५ रुपये दराने केली जात आहे. पावसामुळे बहुतांश फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

नवरात्रोत्सवात उपवासासाठी भेंडी, राजागिरा, बटाटा, रताळी या भाज्यांना मोठी मागणी असते. गेल्या महिनाभरापासून घाऊक आणि किरकोळ बाजारात बटाटय़ाची आवक कमी होत चालली आहे. त्यामुळे बटाटय़ांच्या दरात तेजी निर्माण झाली आहे, अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली.

नवरात्रोत्सवात मार्केट यार्डातील तरकारी विभागात रताळ्यांची आवक वाढली आहे. सांगली जिल्ह्य़ातील कराड, मलकापूर, कर्नाटकातील बेळगाव भागातून सध्या रताळ्याची आवक सुरू आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा रताळ्यांना भाव कमी मिळाले आहेत. नवरात्रोत्सवात अनेकांकडून उपवास केला जातो. उपवासासाठी रताळ्यांना मागणी असते. यंदाच्या वर्षी अधिक मास असल्याने नवरात्रोत्सव एक महिना उशिरा सुरू झाला आहे. अधिक मासापासून रताळ्यांची आवक सुरू झाली आहे. कराड, मलकापूर भागातील रताळी चवीने गोड, आकाराने लहान असतात. त्यामुळे कराड भागातील रताळ्यांना मागणी असते. बेळगावमधील रताळी थोडी तुरट असल्याने मागणी कमी असते, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली. घाऊक बाजारात कराड, मलकापूर भागातील रताळ्यांना प्रतिकिलो २० ते २५ रुपये असा भाव मिळाला आहे. बेळगावमधील रताळ्यांना प्रतिकिलो १२ ते १५ रुपये भाव मिळाला आहे. कराड, मलकापूर भागातून दोन हजार गोणी तसेच बेळगाव भागातून दोन टेम्पोमधून रताळ्याची आवक झाली, असे घुले यांनी सांगितले.