scorecardresearch

समाजमाध्यमी शुभेच्छांमुळे प्रेमदिनी गुलाबांच्या मागणीत घट

प्रेमदिनाला गुलाब पुष्प देऊन प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या प्रेमवीरांना समाजमाध्यमाची भुरळ पडली आहे.

पुणे : प्रेमदिनाला गुलाब पुष्प देऊन प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या प्रेमवीरांना समाजमाध्यमाची भुरळ पडली आहे. समाजमाध्यमातून शुभेच्छा व्यक्त करून प्रेमदिन साजरा करण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या काही वर्षांचा विचार करता यंदा गुलाबांना अपेक्षेएवढी मागणी राहिली नाही. गुलाबांना मोठी मागणी नव्हती, अशी माहिती मार्केट यार्डातील फूल व्यापाऱ्यांनी दिली. प्रेमदिनानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ तसेच शिरूर तालुक्यातून मार्केटयार्डातील फूलबाजारात गुलाबांची आवक होत होती. करोनापूर्व काळात प्रेमादिनाच्या दिवशी गुलाबांना मोठी मागणी असायची. मात्र, गेल्या दोन वर्षांत गुलाबांना अपेक्षेएवढी मागणी यंदा नव्हती. यंदा मागणीत ३० ते ४० टक्के घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मार्केट यार्डातील फूल बाजारातून किरकोळ बाजारातील विक्रेते गुलाब खरेदी करतात. मात्र, किरकोळ विक्रेत्यांकडून गुलाबांच्या मागणीत घट झाली आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. अनेकजण समाजमाध्यमावरून शुभेच्छा पाठवत असल्याने गुलाब फुलांच्या मागणीत घट झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. प्रेमदिनाला साध्या गुलाबाला फारशी मागणी नसते. लाल डच गुलाबांना युवक युवतींकडून मागणी असते. डच गुलाबांमध्ये लाल, पिवळा, पांढरा, नारंगी, अबोली असे रंग उपलब्ध आहेत. विवाह समारंभात विविध रंगी गुलाब फुलांचा सजावटीसाठी तसेच हारांसाठी वापर करण्यात येतो, अशीही माहिती भोसले यांनी दिली. घाऊक बाजारातील गुलाब गड्डीचे दर २० ते ४० रुपये, डच गुलाब (२० नग) १०० ते २५० रुपये असे होते.

करोनापूर्व काळात प्रेमदिनाच्या दोन दिवस आधी किरकोळ बाजारातील विक्रेते गुलाबांची खरेदी करायचे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबांना चांगली मागणी राहील, अशी शक्यता वाटत होती. मात्र, गुलाबांना अपेक्षेएवढी मागणी नाही.

– सागर भोसले, फूल व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, फूल बाजार

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Demand grown significantly result recent corporate scandals ysh

ताज्या बातम्या