पिंपरी : नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडवण्यासाठी, प्रशासन आणि नागरिकांमधील संवादवाढीसाठी आता महापालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी प्रसृत केला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जाणारा हा लोकशाही दिन अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राबवला जाणार आहे. तिन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे प्रत्येकी चार महिन्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागरी सुविधा केंद्राचे विभागप्रमुख हे लोकशाही दिनाचे समन्वय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. समन्वय अधिकाऱ्यांमार्फत लोकशाही दिनाकरिताचे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अर्ज नागरी सुविधा केंद्राच्या बाहेर ठेवले जाणार आहेत. अर्ज वैयक्तिक स्वरूपाचे असावेत. समन्वय अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यातील अर्ज अर्जदाराने १५ दिवस आधी दोन प्रतींत पाठवणे आवश्यक राहील. लोकशाही दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष तक्रार अर्ज स्वीकारला जाणार नाही.

महापालिकेच्या सारथी व क्षेत्रीय स्तरावरील जनसंवाद सभेच्या माध्यमातून दाखल केलेल्या तक्रारींचे निराकरण झाले नसल्यास या तक्रारी लोकशाही दिनामध्ये स्वीकारल्या जातील. न्यायप्रविष्ट प्रकरणे, महसूल, अपील प्रकरणे, सेवा व आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे, आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. निवासी उपजिल्हाधिकारी, वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी, महापालिकेच्या विभागांचे विभागप्रमुख, तसेच प्रशासकीय आवश्यकतेनुसार लोकशाही दिन समन्वयक अधिकाऱ्यांनी आमंत्रित केलेले अधिकारी या लोकशाही दिनास हजर असणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिनाभरात उत्तर

ज्या आठवड्यात लोकशाही दिन झाला असेल, त्याच आठवड्यात संबंधित महापालिका अतिरिक्त आयुक्त हे लोकशाही दिन कार्यक्रमाचा सविस्तर आढावा अहवाल विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पाठवतील. अर्जदाराला अंतिम उत्तर लोकशाही दिनानंतर एक महिन्याच्या आत देण्यात यावे, असा आदेश आयुक्त सिंह यांनी दिला आहे.