चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचे नियोजन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) केले आहे. त्यानुसार पूल पाडण्याआधीची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. पुलाला छिद्रे (ड्रिलिंग) पाडून त्यामध्ये स्फोटके (जिलेटिनच्या कांड्या) भरण्याचे काम सुरू करण्यात आले असून चालू आठवड्यात पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात दररोज सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह विविध कामे हाती घेतली आहेत. त्या अंतर्गत चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी जुना पूल पाडण्याचे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चांदणी चौकात पुलाची पाहणी केली. हा पूल स्फोटकांच्या साह्याने पाडता येईल किंवा कसे, याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचा अहवाल प्रशासनाला सादर झाल्यानंतरच पूल पाडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा : पावसाचे ‘स्वरूप’ बदलल्याने उत्तर, ईशान्य भारत कोरडा ; महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारताला मात्र लाभ

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘चांदणी चौकात येणारी जड वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात आली आहे. शृंगेरी मठ, वेदभवन समोरील काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, या चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून १०० पेक्षा जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. मुळशी-सातारा दरम्यानचा रस्ताही सुरू करण्यात आला आहे. शृंगेरी मठ येथील २७० चौरस मीटर जागा ताब्यात घेऊन काम सुरू करण्यात आले आहे. अशाप्रकारे चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याच्या आधीची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. एनएचएआयने नियोजन केले असून या आठवड्यात पूल पाडण्याची शक्यता आहे.’

हेही वाचा : लोणावळा : मारहाणीमुळे भटक्या श्वानाचा मृत्यू ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियंत्रित स्फोट करण्यासाठी आवश्यक असलेली छिद्रे पाडण्यासाठी दिल्लीच्या कंपनीकडून काम केले जात आहे. तसेच दुसरीकडे पुलावरील सेवावाहिन्या स्थलांतरित करण्याचे कामही जलदगतीने करण्यात येत आहे. पूल पाडण्याबाबत अंतिम तारीख कंपनीकडून कळविली जाणार आहे. त्यानुसार वाहतूक बदलाचे नियोजनही करण्यात आले आहे. – संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय