पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) शनिवार, रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी; तसेच श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्रांसाठी वातानूकुलित पर्यटन बससेवा सुरू केली आहे. किफायतशीर दरात असलेल्या ‘पीएमपी’ने स्वारगेट बस स्थानकावरून माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर, प्रतिक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर- सासवड, संगमेश्वर मंदिर – सासवड, श्री क्षेत्र चांगवटेश्वर मंदिर – नारायणपूर, श्री नारायणेश्वर मंदिर, श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर या ठिकाणी विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएमपीच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यातच कार्यालयीन सुट्ट्यांच्या दिवशी ज्या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद नसतो, त्या मार्गावरील बस रद्द करून पर्यटन आणि धार्मिकस्थळी, प्रवाशांची गर्दी असलेल्या ठिकाणी सोडण्याचे नियोजन तत्कालीन अध्यक्ष दीपा मुधोळ मुंडे यांनी केले. या संकल्पनेतून पीएमपीचे उत्पन्न वाढत असून प्रवासी, पर्यटकांना चांगली सेवा उपलब्ध होत आहे. चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ‘पीएमपी’ने श्रावणानिमित्त शिवलिंगाच्या ठिकाणी बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
‘पीएमपी’च्या विविध आगारांतून १२ बस सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवारी विविध कार्यालये, शाळा, महाविद्यालय, औद्योगिक क्षेत्र, आयटी कंपन्या, नोकदारांना सुट्ट्या असतात. प्रवाशांना सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी सहज जाता यावे, यासाठी भाविकांच्या दृष्टीने धार्मिक ठिकाणांवर बस सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती ‘पीएमपी’चे संचलन विभागाचे मुख्य व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.
असे आहे नियोजन आणि वेळापत्रक
– पुणे रेल्वे स्थानकावरून – सकाळी ८.३०
– माघारी पोहोचण्याची वेळ : सायंकाळी ७
– आसन क्षमतेनुसार केवळ ३३ प्रवाशांचे, समूह आरक्षण केल्यास पाच प्रवाशांना शंभर टक्के सवलत
– प्रतिव्यक्ती ५०० रुपये प्रवासी खर्च
– डेक्कन जिमखाना, पुणे स्थानक, स्वारगेट, कात्रज, हडपसर, गाडीतळ, मनपा भवन, भोसरी, निगडी या आगार केंद्रांवरून आरक्षणाची सुविधा उपलब्ध
श्रावण महिना आणि वर्षाविहारानिमित्त सुट्ट्यांच्या दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गरज लक्षात घेऊन शिवमंदिरांच्या क्षेत्रांवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, ‘पीएमपी’