पिंपरी : ‘वैष्णवीला हगवणे कुटुंबीयांनी क्रूरपणे छळले. कुटुंबाने सांगितलेल्या गोष्टी नाजूक असून, मनाला वेदना देणाऱ्या आहेत. या प्रकरणात वेगवेगळ्या कलमांचा अंतर्भाव करून हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवला जाईल,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पवार यांनी शुक्रवारी वाकड येथे वैष्णवी हिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘या प्रकरणात कोणाचीही हयगय करू नका, राजकीय हस्तक्षेप होणार नाही, अशा सूचना पोलिसांना केल्या होत्या. मी स्वत: पोलीस आयुक्तांच्या संपर्कात होतो. सासरा आणि दीर सापडत नव्हते. ते फोन बदलत होते; पण त्यांना पकडण्यात यश आले. कुटुंबाने दोन वकिलांची नावे दिली आहेत. चांगल्या सरकारी वकिलाकडे हे प्रकरण दिले जाईल. कस्पटे परिवाराला न्याय मिळवून दिला जाईल.’

‘वैष्णवीच्या जावेनेही छळाबाबतच्या व्यथा मांडल्या आहेत. या सर्व गोष्टीचा उल्लेख करून हा खटला सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून सर्व आरोपींना कठोर शिक्षा होईल. हा खटला लवकरात लवकर निकाली काढावा. आरोपींना कायमची अद्दल घडेल, अशी शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली. हा खटला कमकुवत राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल,’ असेही पवार म्हणाले.

नीलेश चव्हाणला अटक करण्याचे आदेश

‘नीलेश चव्हाण याने वैष्णवीच्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी केल्या आहेत. त्याने पिस्तूल दाखवले होते. त्याला अटक करण्याचा आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिला आहे. त्यासाठी पथकांमध्ये वाढ करण्यास सांगितले आहे. मित्र परिवारातील असल्याने या प्रकरणात चव्हाण याचा हस्तक्षेप दिसून येत आहे. त्यानेही पत्नीला घटस्फोट दिला आहे,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

सुपेकरांचा संबंध आढळल्यास कारवाई

कस्पटे कुटुंबीय आणि मयुरी यांनी पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे नाव घेतले आहे. ते हगवणे कुटुंबीयांना मदत करीत असल्याबाबतच्या आरोपाबाबत अजित पवार म्हणाले, ‘माझ्या कानावरही ही बाब आली. मी सुपेकरांशी बोललो. तुमच्याबाबत दबक्या आवाजात बोलले जात आहे. यदाकदाचित फोनचे कनेक्शन जोडले गेले, तर सरकार निश्चितपणे हयगय करणार नाही. यावर सुपेकर यांनी या प्रकरणाशी आपला दुरान्वयेही संबंध नसल्याचे सांगितले आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मयूरी जगताप-हगवणे प्रकरणात कारवाई करण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या जातील. तिची तक्रार घेतली नसेल, तर त्याची शहानिशा केली जाईल. पोलीस दोषी असतील, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.- अजित पवार, उपमुख्यमंत्री