पुणे : ‘राज्यातील गावांसाठी राज्य शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी केली. त्यातून गावांना काही चांगल्या सवयी लागल्या. गावांमध्ये सुधारणाही झाल्या. मात्र त्यामध्ये सातत्य राहिले नाही,’ अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी येथे गुरुवारी व्यक्त केली. ग्रामविकासात लोकसहभाग महत्त्वाचा असून त्यातूनच आदर्श आणि समृद्ध गावे निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भूषण जोशी, माजी सनदी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यावेळी उपस्थित होते.

‘राज्य शासनाने येत्या १६ सप्टेंबरपासून म्हणजेच मराठवाडा मुक्ती दिनापासून पुढील १०० दिवस मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाद्वारे प्रत्येक गावाने स्वतःचा विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. शासनाने या अभियानासाठी तब्बल २४५.२० कोटी रुपयांची बक्षीस योजना आखली आहे. यातून राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर आणि पंचायत समिती स्तरावरील स्पर्धा होणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव केला जाईल. स्वच्छता, शाश्वत विकास, हरित उपक्रम, महिला व बालकांच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार आदी निकषांवर गावांचे मूल्यमापन होईल,’ असे पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी ग्रामविकासाच्या अनेक योजना आणल्या. केंद्र सरकारनेही त्या स्वीकारून त्याची देशभरात अंमलबजावणी सुरू केली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये पुणे जिल्ह्याच्या राज्यात प्रथम क्रमांक आला पाहिजे.’

‘राज्य शासनाने जिल्हा वार्षिक नियोजनाअंतर्गत तब्बल २२ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गावपातळीपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी या निधीचा पारदर्शकपणे वापर करून गावांचा सर्वांगीण विकास करावा,’ असे आवाहनही पवार यांनी केले.

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियान राबविताना शेतकरी आणि ग्रामस्थ हा घटक केंद्रबिंदू मानून, सरपंच, आमदार आणि खासदार तसेच मंत्र्यांनी ठसा उमटेल असे काम करावे,’ असे भरणे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. गजानन पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.