पावसाळा हा डासांच्या प्रजननाचा काळ असून या काळात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा डासांमुळे फैलावणाऱ्या आजारांचे प्रमाणही मोठे असते. त्यांचे निदान योग्य वेळी न झाल्यास रुग्णांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असतो. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, झिका यांचे निदान करण्यासाठी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स या पुण्यातील जैवतंत्रज्ञान कंपनीने एका विशेष चाचणी संचाची निर्मिती केली आहे.

पावसाळी आजारांमध्ये ताप, थंडी, अंगदुखी आणि थकवा ही सर्वसाधारण लक्षणे आहेत. मात्र, लक्षणे सारखी असली तरी त्यातून विविध आजारांची शक्यता असते. आजाराचे नेमके निदान करण्यासाठी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सने ‘एक्सटेंडेड मान्सून फीव्हर पॅनल’ या चाचणी संचाची निर्मिती केली आहे.

मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू, झिका, लेप्टोस्पायरोसिस आणि सालमोनेलोसिस यांचे नेमके निदान या चाचणी संचाद्वारे अवघ्या दोन तासात होऊ शकते, असे मायलॅबतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ म्हणाले, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरीया, झिका, लेप्टोस्पायरोसिस अशा रोगांचा धोका पावसाळ्यात अधिक असतो. त्यामुळे या चाचणी संचाची निर्मिती करण्यात आली असून अचूक आणि वेगवान निदानामुळे रोगांच्या फैलावाला वेळीच निर्बंध घालणे शक्य आहे. कीटकजन्य रोगांमुळे भारतात आणि जगभरात मोठ्या संख्येने नागरिकांना संसर्ग होतो. लाखो रुग्ण या आजारातील गुंतागुंतीमुळे दगावतात. तातडीने निदान आणि उपचार झाले असता हे प्रमाण रोखणे शक्य आहे, असेही रावळ यांनी स्पष्ट केले. हे चाचणी संच लवकरच प्रयोगशाळा स्तरीय चाचण्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.