पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यात दौरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुचर्चित प्रकल्पांची उद्घाटने आणि महत्त्वाकांक्षी योजनांचे भूमिपूजन असे भरगच्च कार्यक्रम पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडूनही महापालिकेला तत्त्वत: होकार कळविण्यात आला असून उद्घाटने आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर महापालिका निवडणुकीचे रणिशग फुंकले जाईल.

महापालिकेची आगामी निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्याच्या प्रारंभी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांतील प्रकल्पांचे उद्घाटन करून निवडणूक प्रचाराला प्रारंभ करण्याचे नियोजन महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केले आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय या दरम्यान मेट्रोची प्रवासी सेवा, नदी सुधार योजना, मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरूज्जीवन आणि सुशोभीकरण योजना, विजेवर धावणाऱ्या गाडय़ा (इलेक्ट्रीकल बस- ई-बस) अशा काही महत्त्वपूर्ण योजना आणि प्रकल्पांचा यात समावेश आहे. दरम्यान, सहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेपैकी वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे.

वनाज ते गरवारे महाविद्यालय या दरम्यान मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो मार्गिकाही सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेचा पंतप्रधान कार्यालयाबरोबर संपर्क सुरू होता. त्यानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा होईल, असे संकेत पंतप्रधान कार्यालयाकडून महापालिकेला देण्यात आले आहेत. त्याबाबतची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. अधिकृत तारीख निश्चित झाली नसली तरी सहा मार्च रोजी दौरा होईल, अशी शक्यता मोहोळ यांनी व्यक्त केली.

भारतीय जनता पक्षाने पाच वर्षांच्या कालावधीत अनेक विकासप्रकल्प राबविले आहेत. या प्रकल्पांची उद्घाटने आणि महत्त्वाकांक्षी योजनांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतील. नदी सुधार योजना, नदीकाठ संवर्धन, पुनरूज्जीवन आणि सुशोभीकरण योजना, महापालिका भवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एक हजार घरांची सोडत, प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उद्घाटन आणि केंद्र सरकारकडून पीएमपीला मिळणाऱ्या सत्तर ते ऐंशी ई-बसचे लोकार्पण हे कार्यक्रम होतील, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी

सांगितले.

राजकीय वातावरण तापणार

निवडणुकीसाठी महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. दोन मार्च रोजी प्रभाग रचना आराखडा अंतिम होईल. त्यानंतर आरक्षण सोडत जाहीर होऊन निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित होणार आहे. त्यापूर्वी उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम करून निवडणुकीच्या प्रचाराचे रणिशग भारतीय जनता पक्षाकडून फुंकले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development work before municipal elections prime minister narendra modi visit to pune akp
First published on: 23-02-2022 at 00:01 IST