पिंपरी : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आपली भूमिका मांडली आहे.भाजप, काँग्रेस, शिवसेना या पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. निवडणूक जवळ येताच तसे प्रवेश होताना दिसतील. महापालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल आणि पक्ष आपले वर्चस्व निर्माण करेल’, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला.

अण्णा बनसोडे म्हणाले, ‘राज्यात महायुतीचे सरकार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वजण युतीचा धर्म पाळणार आहेत. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. २०१७ पूर्वी पिंपरी महापालिकेत १५ वर्षे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नगरसेवक भाजपमध्ये गेले. त्यामुळे भाजपचे जास्त नगरसेवक निवडून आले आणि सत्ता आली. पिंपरी-चिंचवड शहराचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकास झाला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, असा ठाम विश्वास आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. इतर पक्षातून अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत.’

स्वबळावर लढावे अशी कार्यकर्त्यांची भावना

‘महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या सर्व पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. कार्यकर्त्यांची कुचंबणा व्हायला नको, यामुळे प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढावे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. आठ वर्षांनी निवडणूक होत आहे. त्यामुळे तळागाळात काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्याला लोक निवडून देतील’, असेही ते म्हणाले.

स्वबळावर लढलो तरी युतीचा धर्म पाळण्याचे ठरले

‘स्वबळावर लढलो तरी महायुतीमधील सर्व पक्षांनी युतीचा धर्म पाळण्याचे ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवडची निवडणूक विकासाच्या मुद्यावरच लढणार आहे. १५ वर्षे अजित पवार यांनीच शहराचा कायापालट केला आहे. हे शहरवासीयांना माहिती आहे. त्यामुळे कोणीही कोणत्या पक्षावर आरोप न करता आगामी निवडणूक सामंजस्याने लढविली पाहिजे. राज्यात युतीचे सरकार असल्याने युतीचा धर्म पाळणे प्रत्येकाचे कर्तव्य अशी’ अपेक्षा बनसोडे यांनी व्यक्त केली.

पक्षात अंतर्गत कलह

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यामुळे थोडाफार कलह आहे. परंतु, पक्षातील प्रत्येकजण अजित पवार यांचे नेतृत्व मानणारा आहे. कोणाला उमेदवारी द्यायची याचा सर्वस्वी निर्णय अजित पवार घेणार आहेत. त्यामुळे अजितदादा जो निर्णय घेतील. त्या निर्णयाचे माझ्यासह सर्व कार्यकर्ते पालन करतील. दादांचा आदेश मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. विधानसभा निवडणुकीत कोणी पक्षाचे कोणी काम केले नाही, हे अजित पवार यांना माहिती आहे’, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

भाजपमधील कार्यकर्ते राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक

‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केले. तीन टर्म आमदार म्हणून काम करत आहे. अजित पवार यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभा उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. आगामी महापालिका निवडणूक सर्वजण एकदिलाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. भाजप, काँग्रेस, शिवसेना या पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. निवडणूक जवळ येताच तसे प्रवेश होताना दिसतील. महापालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल’, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला.