पुणे : ‘उच्च व तंत्रशिक्षणात स्वायत्तता सर्वांत महत्त्वाची आहे. स्वातंत्र्य, स्वायत्ततेशिवाय नवीन संशोधन होऊ शकत नाही. आपल्याकडे अजूनही स्वायत्तता द्यायची मानसिकता दिसून येत नाही. स्वायत्तता द्यायची म्हटल्यावर ज्याच्याकडे नियंत्रण आहे, त्याला आपल्या घरचेच काही चालले आहे असे वाटते. आता ही मानसिकता बदलावीच लागेल. जास्तीत जास्त संस्थांना स्वायत्तता देणे हा धोरणात्मक निर्णय आहे,’ अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. तसेच, स्वायत्तता स्वैराचारात जाणार नाही याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठ, ‘सीओईपी’ माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे आयोजित ग्रंथालय, संगणक विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन, अभियंता दिनानिमित्त ‘सीओईपी’ अभिमान पुरस्कार प्रदान कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान फोरमचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरुड, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते, सचिव प्रा. सुजित परदेशी, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे या वेळी उपस्थित होते. विद्यापीठातर्फे ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंता रामास्वामी यांना जीवनगौरव पुरस्कार, विलास जावडेकर, महांतेश हिरेमठ, जयंत इनामदार, उन्मेश वाघ, श्रावण हर्डीकर, तुषार मेहेंदळे यांना सीओईपी अभिमान पुरस्काराने गौरवण्यात आले.
‘‘सीओईपी’चा १७२ वर्षांचा इतिहास आहे, २०२८ मध्ये १७५ वर्षे होत आहेत. हा १७५ वर्षांचा इतिहास देशाच्या इतिहासातील विलक्षण प्रवास आहे,’ असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले. ते म्हणाले, ‘सीओईपीसारख्या संस्थांना अधिक महत्त्वपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कम्प्युटिंगमुळे जगाच्या प्रगतीचा आणि उलथापालथींचा वेग अनालकनीय आहे. क्वांटम कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात योग्य पावले टाकल्यास भारतीय विद्यार्थी जग व्यापू शकतात. तशा प्रकारचे कुशल मनुष्यबळ घडवण्याचा पुढाकार शिक्षण संस्थांना घ्यावा लागेल.’
‘पंतप्रधानांनी आता संशोधन क्षेत्रावर भर दिला आहे. संशोधनच देशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. शिक्षण संस्थांना पैसे देता येत नाहीत. मात्र, ‘सीएसआर’ ही मोठी ताकद आहे. आर्थिक अडचणींमुळे अर्थ विभाग प्राध्यापक भरतीला परवानगी देत नाही. प्राध्यापक, संशोधनाची कमतरता अशा कारणांनी क्रमवारीत घसरण झाली आहे,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
‘२०३० पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या १० हजारांपर्यंत नेणे, वसतिगृह निर्मिती, संशोधनाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. क्वांटम तंत्रज्ञान, ड्रोन मिशनमध्येही विद्यापीठाचा सहभाग आहे. भारतीय ज्ञान प्रणालीसाठी भांडारकर संस्थेसह विविध संस्थांशी करार केले आहेत,’ असे डॉ. भिरुड यांनी नमूद केले.
गिते म्हणाले, ‘गेल्या तीस वर्षांत २५ हजांरांहूुन अधिक विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडण्यात आले आहे. युरोप, अमेरिकेसह जगभरात संघटना पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कार्यप्रशिक्षण अशी विविध कामे करण्यात येतात. १०० विद्यार्थ्यांच्या शुल्काचे दायित्व माजी विद्यार्थी संघटनेने देणग्यांच्या जोरावर घेतले आहे.’
‘चंद्रकांत पाटील यांना अर्थ विभागाचा झटका’
चंद्रकांत पाटील यांच्या भाषणातील वित्त विभागाचा संदर्भ घेऊन फडणवीस म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांना अर्थ विभागाचा झटका लागला आहे. पण, ‘सीओईपी’सारख्या संस्थेला मदत करायची नाही, तर कोणाला करायची? येत्या काळात ‘सीओईपी’ला अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक ते निधी, स्रोत उभे केले जातील. ‘सीओईपी’ थोडी मजबूत केली, तर ही संस्थाच मोठ्या प्रमाणात स्रोत जमा करू शकते.’