पुणे : पालखी सोहळ्यात दोन भाविकांकडील मोबाइल संच चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी (२२ जून) प्रस्थान झाले. पुणे-सोलापूर रस्त्यावर रविवारी सकाळी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. शिवम कमलेश पांडे (वय २६, रा. सुयोग अपार्टमेंट, ओैंध) हे पुणे-सोलापूर रस्त्यावर भैरोबा नाला परिसरात सकाळी पावणेनऊच्या सुमारास दर्शनासाठी थांबले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेत असताना चोरट्यांनी त्यांच्याकडील दहा हजारांचा मोबाइल संच लांबविला. मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पांडे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस हवालदार गाढवे तपास करत आहेत.

हडपसर गाडीतळ परिसरात रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पालखीचे दर्शन घेत असताना नितीन साळुंखे (वय ४२, रा. घोटवडे, ता. मुळशी) यांच्या खिशातून नऊ हजारांचा मोबाइल संच चोरट्यांनी लांबविला. याबाबत साळुंखे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार गव्हाणे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालखी सोहळ्यात महिलांचे दागिने लांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या. पालखी सोहळ्यातील चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. गर्दीत चोरट्यांनी भाविकांकडील मोबाइल संच, दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या. काही भाविकांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या नाहीत.