गेली काही वर्षे पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख बनलेल्या ढोल-ताशा पथकांची सुरुवात एक उपक्रम म्हणून झाली असली, तरी आता या पथकांचा ‘बाजार’ होताना दिसत आहे. छंद म्हणून सुरू झालेल्या या पथकांमधील व्यावसायिक कंगोरा लक्षात घेऊन या पथकांमध्ये चक्क गुंतवणूक करण्यास सुरुवात झाली आहे. जाहिरातींसाठीही पथकांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होताना दिसत आहे.
दरवर्षी पुण्यातील ढोल-ताशा पथकांची संख्या ही २० ते २५ नी वाढते आहे. या वर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विविध संघटना आणि संस्थांकडे नोंद झालेली पथके ही साधारण २३० च्या आसपास आहे. पथकांमध्ये उत्साहाने सहभागी होणारी तरुणाई आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी उलाढाल यांनी स्थानिक नेते, नगरसेवक, दादा, भाई अशा सगळ्यांनाच खुणावत आहे. छंद म्हणून सुरू झालेल्या या पथकांनी आता एका मोठय़ा बाजारपेठेचे स्वरूप घेतले आहे. बहुतेक स्थानिक नेत्यांनी आता स्वत:ची पथके सुरू केली आहेत. वाद्य, सरावासाठी जागा यासाठी गुंतवावे लागणारे लाखभर रुपये हे बहुतेक वेळा एकाच गणेशोत्सवात वसूल होतात. शिवाय आपल्या मंडळासाठी हक्काचे पथक आणि त्यामध्ये हौशीने सहभागी होणाऱ्या तरुणाईशी नियमित संपर्क यांमुळे पथकांमधील गुंतवणूक नेत्यांना खुणावत आहे. व्यवसाय म्हणून उभी राहणारी ही पथके आता फक्त गणेशोत्वसापुरतीच मर्यादित न राहता वर्षभर विविध सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये वादन करत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून जाहिरातीसाठीही पथकांचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. ढोल रंगवणे, ढोलावरची झूल, पथकांचे गणवेश किंवा पथकांबरोबर प्रत्यक्ष फलक उभे करून जाहिराती केल्या जात आहेत. अनेक मोठय़ा कंपन्यापासून स्थानिक व्यावसायिकही जाहिरातींसाठी पथकांचा वापर करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुंतवणूक वाढली आणि स्पर्धाही
पथकांमध्ये फायद्यासाठी गुंतवणूक केली जात असली, तरी दुसरीकडे पथकांमधील स्पर्धाही शिगेला पोहोचली आहे. याचा मोठा फटका फक्त हौस म्हणून सुरू असणाऱ्या पथकांना बसतो आहे. मंडळाच्या मिरवणुका मिळवणे, वादक मिळवणे यांमुळे राजाश्रय न घेता चालणाऱ्या पथकांना टिकून राहण्यासाठी धडपड करावी लागत आहे. पूर्वी पथकांना बाहेरगावाहूनही मिरवणुका मिळत होत्या. मात्र, आता पुण्याप्रमाणेच मुंबई, ठाणे या ठिकाणीही पथके सुरू होत असल्यामुळे पुण्यातील पथकांना बाहेरगावाहून मिळणाऱ्या मिरवणुका कमी झाल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhol is too loud
First published on: 25-08-2015 at 08:17 IST