इतिहासाच्या पाठय़पुस्तकातील मजकुरामध्ये जातीवादी, सामाजिक आणि राजकीय संघटनांना नको तेवढे स्वारस्य असते. त्यातून राजकीय फायदा शोधण्याचे कामही काही मंडळी करीत असतात. त्यामुळे इतिहासाचे आदर्श पाठय़पुस्तक तयार करणे अवघड आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी व्यक्त केले.
इतिहास शिक्षक महामंडळातर्फे मोरे यांच्या हस्ते डॉ. राजा दीक्षित यांना म. कृ. केरूळकर इतिहास शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा. ज. वि. नाईक, महामंडळाचे अध्यक्ष म. कृ. केरूळकर, उपाध्यक्ष श्री. दा. थावरे, कार्याध्यक्ष बापूसाहेब शिंदे या वेळी उपस्थित होते. आसावरी दंडवते यांना डॉ. सुमन वैद्य इतिहास शिक्षिका पुरस्काराने, दिलीप पाटील आणि शिवकन्या कदेरकर यांना डॉ. अरिवद देशपांडे पुरस्काराने तर, अनुष्का कदम, रईसा शेख आणि कांचन मोहिते यांना डॉ. अ. रा. कुलकर्णी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.डॉ. मोरे म्हणाले, अ. रा. कुलकर्णी, ज. वि. नाईक आणि राजा दीक्षित यांनी इतिहासाचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाच्या कक्षा रुंदावल्या. संगीत, चित्रकला, गायन या कलांच्या इतिहासाचा अभ्यास कलाअभ्यासकांऐवजी इतिहास संशोधकांनी केला पाहिजे. त्यामुळे कलेचा नेमका इतिहास समोर येईल. इतिहास संशोधनामध्ये अराजकतावाद निषेधवाद हे दोन मोठे धोके आहेत याचे भान संशोधकांनी ठेवले पाहिजे.
प्रा. नाईक म्हणाले, खोटे बोलू नये आणि खरे सांगण्यास घाबरू नये हे इतिहासातील प्रमुख दोन कायदे आहेत. त्याचे इतिहास संशोधकांनी भान ठेवावे. सत्याचा शोध, मूल्य तपासणे हे इतिहास संशोधनाचे प्रमुख काम आहे.