पुणे विमानतळात प्रवेश करणे आणि तेथील सुरक्षा तपासणी सुटसुटीत व्हावी या हेतूने डिजियात्रा सुविधेचा वापर सुरू झाला. ‘डिजियात्रा’च्या माध्यमातून ‘फेशिअल रेकग्नेशन’ तंत्राच्या साहाय्याने प्रवाशांची ओळख पटवली जाऊ लागली. परंतु, ही सुविधा पहिल्याच आठवड्यात बंद पडली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पुणे विमानतळावर ३१ मार्चला डिजियात्रा सुविधा सुरू झाली. आता पहिल्याच आठवड्यात डिजियात्रा सुविधा बंद असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. ट्विटरसह समाजमाध्यमांवरही प्रवाशांनी याबाबत भारतीय हवाई वाहतूक प्राधिकरण आणि पुणे विमानतळ प्रशासनाला जाब विचारला आहे. पीयूष चोप्रा या प्रवाशाने डिजियात्रा सुविधा शुक्रवारी बंद असल्याची तक्रार केली आहे. ही सुविधा बंद असल्यामुळे विलंब लागून विमान चुकण्याची वेळ आली होती, असेही या प्रवाशाने म्हटले आहे.

हेही वाचा >>> पुणे : आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणारा बुकी जाळ्यात; गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई

विमानतळाच्या प्रवेशद्वारावरील डिजियात्रा सुविधा बंद असल्याची तक्रार चिन्मय अरुण गोयल या प्रवाशाने केली आहे. विमानतळावरील सुविधा बंद असली, तरी डिजियात्रा ॲप्लिकेशनवर ही सुविधा सुरू असल्याचे दिसत असून, त्यात बदल करावा, अशी मागणी या प्रवाशाने केली आहे.

दरम्यान, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी डिजियात्रा सुविधा सुरू असल्याचा दावा केला.

डिजियात्राचा वापर सुरू झाला तरी सध्याची विमानतळात प्रवेश करणे आणि सुरक्षा तपासणीची व्यवस्था कायम आहे. प्रवाशांना डिजियात्रा अथवा सध्या सुरू असलेल्या पद्धतीपैकी एकाची निवड करावी लागते. जास्तीत जास्त प्रवाशांनी डिजियात्राचा वापर करावा, असा विमानतळ प्रशासनाचा प्रयत्न आहे. आधी देशातील तीन विमानतळांवर डिजियात्रा सुविधेचा वापर होत होता. दिल्ली, बंगळुरू आणि वाराणसी विमानतळावर ही सुविधा मागील वर्षी डिसेंबरपासून सुरू झाली. ही सुविधा असणारे पुणे हे चौथे विमानतळ ठरले. याच वेळी कोलकता आणि विजयवाडा या विमानतळांवरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिजियात्राचा वापर कसा होतो?

प्रवाशांना मोबाइलवर डिजियात्रा ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागते. प्रवासी त्याचे ओळखपत्र आणि प्रवासाशी निगडित कागदपत्रे त्यात ठेवू शकतो. विमानतळावर पोहोचल्यानंतर फेशिअल रेकग्नेशन तंत्राद्वारे प्रवाशाची ओळख पटवली जाते. त्याच वेळी प्रवाशाच्या ओळखपत्रांचीही तपासणी होते. त्यामुळे प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होऊन विमानापर्यंत पोहोचण्याचा वेळही कमी होतो.