पुणे : ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकाद्वारे सुनीताबाई देशपांडे यांनी भाई आणि त्यांच्या सहजीवनाचा चिकित्सक प्रवास उलगडला आहे. मात्र, त्यांचे ५४ वर्षांचे सहजीवन हे आदर्श, चिकित्सक आणि तरीही परस्परपूरक असेच होते, अशा भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गुरुवारी व्यक्त केल्या. पुलंचा २५ वा स्मृतिदिन व सुनीताबाईंच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सवा’त ‘सर्जनशील सहजीवन : पुलं आणि सुनीताबाई’ या विषयावरील परिसंवादात दिनेश ठाकूर, डॉ. मंदार परांजपे, सतीश पाकणीकर सहभागी झाले होते. त्यांच्याशी मंगला गोडबोले यांनी संवाद साधला. महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले, ‘सुनीताबाईंचा भाचा या नात्याने मला दोघांनाही खूप जवळून अनुभवता आले. ‘आहे मनोहर तरी’ लिहावे का अशा द्विधा मन:स्थितीत त्या होत्या. या पुस्तकामुळे लोक दुखावले जाणार नाहीत ना, ही मार्मिक टिप्पणी पुलंची होती. ‘आहे मनोहर तरी’मध्ये पुलंचे जे व्यक्तिमत्त्व रेखाटले गेले, त्यावर साहित्यविश्वातील अनेकांनी टीका केली. मात्र, कौटुंबिक पातळीवर ती वादळे निर्माण झाली नाहीत. तर ते पुस्तक अगदी सहजतेने स्वीकारले गेले. दोघांना एक वैचारिक भूमिका असल्याने कोणत्याही मुद्द्यावर चर्चा आणि मंथन व्हायचे. परंतु, त्यांची जीवनमूल्ये एकच असल्याने निर्णय दोघांना हवाहवासा असाच व्हायचा.
परांजपे म्हणाले, ‘डाॅ. बाबा आमटे यांच्या आनंदवनात गेल्यानंतर तेथील दृष्टिहीन मुलांनी गुलाबाच्या फुलाला हात लावल्यावर काटे टोचून रक्त यायचे. त्यामुळे हे दाम्पत्य दुःखी झाले. त्यावेळी बिनकाट्याच्या गुलाबाचे रोप लावण्यासाठी जंगजंग पछाडलेल्या या सुनीताबाईच होत्या. रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये त्यांना बिनकाट्याचा गुलाब मिळाला, तेव्हा हे दोघे निश्चिंत झाले. कोणत्याही नाट्यप्रयोगानिमित्त बाहेरगावी जाताना, ‘काहीही विसरू नको,’ अशा सूचना सुनीताबाई पुलंना आवर्जून द्यायच्या. याला अपवाद फक्त आनंदवनाचा होता. कारण आनंदवनात गेल्यानंतर भाई स्वतःलाच विसरून जायचे.’
पाकणीकर म्हणाले, ‘सुनीताबाई आणि पुलंचे एकत्रित छायाचित्र घेण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला, मात्र, सुनीताबाईंचा त्याला कायम विरोध असायचा. मात्र, जीए पुरस्कार स्वीकारताना मला त्यांचे छायाचित्र टिपता आले. एका गमतीशीर प्रसंगी सुनीताबाई पुलंच्या पाया पडत आहेत, असे एक वेगळे छायाचित्रदेखील मी टिपले आहे.’