‘..तर दोन वर्षे केंद्र सरकार झोपले होते काय?’
इस्लाम दहशतवादविरोधी असल्याचा प्रचार करणारे झाकिर नाईक ही धोकादायक व्यक्ती असेल तर दोन वर्षांत केंद्र सरकारला कळले नाही का की गृह विभाग झोपला होता, असा सवाल करीत काँग्रेसचे सरचिटणीस खासदार दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी नाईक यांचे उघडपणाने समर्थन केले. जर पीस टीव्हीवर बंदी आणू शकता तर, सुदर्शन टीव्हीवर का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर पुण्यामध्ये आलेल्या दिग्विजय सिंह यांची काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद झाली. धार्मिक ध्रुवीकरण करून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करीत भाजप सत्ता शाबूत ठेवण्याचे षड्यंत्र करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
झाकिरसमवेत २०१२ मध्ये मी ज्या परिषदेत सहभागी झालो होतो त्यामध्ये त्यांनी शांततेचा पुरस्कार केला होता. मग आताच झाकिरवर संशय का घेतला जात आहे, असे सांगून सिंह म्हणाले, त्या परिषदेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल भाजप आणि मोदीभक्त माझी ‘प्रशंसा’ करीत आहेत. मोदी स्वामी असीमानंद आणि आसाराम बापू यांच्या पाया पडतात ते चालते. मग, मी झाकिरच्या कार्यक्रमात गेलो म्हणून बिघडले कोठे? झाकिर ही धोकादायक व्यक्ती असेल तर दोन वर्षे सरकार झोपले होते का? झाकिरची अनेक भाषणे यू-टय़ूबवर आहेत. दोन वर्षांत सरकारने त्याची पडताळणी केली नाही का? मुसलमानांना भडकावत असेल असा आरोप झाकिरवर व्यक्त केला जात असेल तर, हिंदूना भडकाविणाऱ्यांवरदेखील कारवाई झाली पाहिजे. साक्षी महाराज, साध्वी प्राची यांच्यावर कारवाई का होत नाही? सीमी आणि बजरंग दल यांच्यावर बंदी आणावी अशी मागणी करणारा मी देशातील एकमेव मुख्यमंत्री होतो. मात्र, तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केवळ सीमीवरच बंदी घातली होती.
‘काश्मीरचा प्रश्न भाजपला समजलाच नाही’
पिंपरी- काश्मीर खोरे पेटले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यात मग्न होते, ते टांझानियात विकासाचा ढोल बडवत बसले, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केली. केंद्र सरकार तसेच काश्मीरमधील पीडीपी-भाजप संयुक्त सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरमध्ये ही स्थिती उद्भवली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (१४ जुलै) दिग्विजयसिंह आळंदीत माउली मंदिरात दर्शनासाठी सपत्नीक आले होते, तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नेहरू आणि इंदिरा गांधी यांना काश्मीरचा प्रश्न समजला होता. काश्मिरी लोकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे प्रयत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. मनमोहन सिंग यांनी ते प्रयत्न सुरू ठेवले. मात्र, मोदी यांना हा प्रश्न समजलेलाच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकेचे चार पोलीस अधिकारी मृत्युमुखी पडले. तरी, राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दौरा रद्द करून भेट देतात. काश्मीर जळत असताना मोदी टांझानियात ढोल बडवत बसले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digvijay singh supporting zakir naik
First published on: 16-07-2016 at 05:07 IST