पुणे : पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले वसंत मोरे यांनी बुधवारी सकाळी वाडेश्वर कट्टा येथे एकत्र येत शहर हितासंदर्भात चर्चा केली. निवडून आल्यानंतर शहरासाठी काय करणार, याचा आराखडा त्यांनी मांडला. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात कडवट टीका-टिप्पणी करणाऱ्या या उमेदवारांनी शहर विकासासाठी कटीबद्ध आहेत, हे सांगतानाच शहरातील प्रगल्भ राजकीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

सुपरिचित वाडेश्वर कट्ट्यावर मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्या गप्प्पांची मैफल रंगली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर आणि डाॅ. सतीश देसाई या सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या अराजकीय व्यासपीठावरून या तिघांमध्ये राजकीय चर्चाही रंगली.

हेही वाचा >>>सीईटी सेलचा मोठा निर्णय : उत्तरतालिकांतील प्रश्नोत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी एक हजार रुपये शुल्क

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि त्यानंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर विशेषत: मोहोळ आणि धंगेकर यांच्यात जोरदार टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. या दोघांनी प्रचारालाही सुरुवात केली असून, त्यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी शहराच्या प्रश्नांबाबत चर्चा केली.

राजकारण करताना शहराच्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. वाहतूक कोंडी, प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची समस्या शहरात आहेत. त्या सोडविण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन मोहोळ आणि धंगेकर यांनी दिले. तर शहराला नवी दिशा देण्यासाठीच मनसेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुणेकरांचे हित कायम पाहिले जाईल, असे आश्वासन मोरे यांनी दिले.