पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेतल्या जाणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षांच्या उत्तरतालिकांतील प्रश्नोत्तरांवर उमेदवारांना आक्षेप, हरकती नोंदवता येणार आहे. मात्र त्यासाठी उमेदवारांना प्रत्येक आक्षेप, हरकतीसाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतल्या जातात. या परीक्षांच्या उत्तरतालिकांमधील उत्तरांवर उमेदवारांना हरकत, आक्षेप नोंदवता येतो. त्यासाठी सीईटी सेलने ऑब्जेशन ट्रॅकर सुविधा विकसित केली आहे. तसेच आक्षेप नोंदवण्यासाठीचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. ऑब्जेशन ट्रॅकरद्वारे उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची प्रगती तपासता येईल. उमेदवारांना २७ ते ३ एप्रिल या कालावधीत शुल्क भरून प्रश्नोत्तरांसंदर्भात आक्षेप, हरकत नोंदवता येणार आहेत.

हेही वाचा : मी काही स्वार्थासाठी बारामती, बारामती करायला आलो नाही : अजित पवार

एकापेक्षा जास्त जास्तमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल समान गुणानुसार जाहीर केला जाणार आहे. उमेदवाराला मिळालेले मूळ गुण समान गुणांपेक्षा वेगळे असू शकतात. नोंदणीवेळी वापरलेल्या ई-मेलद्वारेच आक्षेप-हरकती नोंदवता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहिती cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.