scorecardresearch

“आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या”, पुण्यात चंद्रकांत पाटलांचे बॅनर चर्चेत

पुण्यात या बॅनर्सची जोरदार चर्चा सुरू आहे ; सोशल मीडियावर हे बॅनर तुफान व्हायरल होत आहेत.

पुणेकर हे टोमणे मारण्यात जगात प्रसिद्ध असल्याचं बोललं जातं. शिवाय, अनेकदा त्याचा प्रत्यय देखील येतो. किमान शब्दात कमाल अपमान करणे ही पुणेकरांची खासियत असल्याचंही सांगितलं जातं. शिवाय पुणेरी पाट्यांबाबत तर आणखी वेगळं काही सांगायलाच नको. पुणेरी पाट्यांवरील मजकूर तर जगभरात चर्चेत असतो. आता पुणेरी पाट्यांपाठोपाठ पुण्यात झळकणाऱ्या बॅनर्सची देखील चर्चा होताना दिसत आहे. कोथरूडमध्ये लावण्यात आलेले अशाचप्रकारेच एक बॅनर सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे, शिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. कारण, हे बॅनर ज्यांच्यासाठी लावलं आहे आणि या बॅनरवर जो मजकूर हे दोन्ही अर्थातच काही सामान्य नाही.

पुण्यातील कोथरुडमध्ये म्हणजेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात हे बॅनर झळकले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर चंद्रकांत पाटील यांचा फोटो असून, त्यासोबत ‘दादा परत’ या असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

“दाद परत या!, दादा एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाहीये. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या. समस्त कोथरूडकर.” असा एका बॅनरवर मजकूर आहे आणि यावरच चंद्रकांत पाटील यांचा पुणेरी पगडी घातलेला फोटो देखील आहे.

तर, अशाचप्रकारचे आणखी एक बॅनर समोर आले असून, “पुणे शहरातील कोथरूड मतदार संघातील आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिनाभरापासून हरवले आहेत. कोणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा, समस्त कोथरुडकर. ” असा संदेश या बॅनरवर आहे आणि यावर देखील चंद्रकांत पाटील यांचा फोटो आहे.

कोथरुड परिसरात लागलेले हे बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय बनले आहेत. शिवाय, सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहेत. हे बॅनर नेमके कोणी लावले हे मात्र गुपितच आहे. परंतु, चंद्रकांत पाटील यांच्या विरोधकांना मात्र टीका करण्याची चांगलीच संधी सापडली आहे.

सध्या कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्त कोल्हापूरमध्येच ठाण मांडून बसल्याचे दिसत आहे. परिणामी त्यांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या कोथरुडमध्ये नागरिकांनी त्यांना परत बोलवण्यासाठी ही शक्कल लढवल्याचे दिसत आहे. या बॅनरची पुण्याच्या राजकीय वर्तुळात देखील चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Discussion of chandrakant patils banner everywhere in pune msr

ताज्या बातम्या