आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने बालभारतीकडून आज (बुधवार) पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू करण्यात आले. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार असून एकूण ५ कोटी ४० लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव येथील भांडारात हिरवा झेंडा दाखवून पाठ्यपुस्तक वितरणाची सुरुवात करण्यात आली. शिक्षण विभागातील प्रकल्प संचालक कैलास पगारे, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी इंदरसिंग गडाकोटी, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन आदी उपस्थित होते. तर बालभारतीच्या पुणे येथील कार्यालयात शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, प्राथमिक संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, वित्त व लेखा अधिकारी भारती देशमुख, अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी उज्ज्वला ढेकणे आदि उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश –

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याना राज्य शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय कार्यालयांकडूनही वितरण सुरू करण्यात आले आहे. अभियानातील पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त पहिली ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शालेय वर्ष २०२२-२०२३ साठी एकूण ५ कोटी ४० लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार आहे. जूनमध्ये शाळा सुरू होणार असल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी ही सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.