पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सोमवारी १३ मे रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने हरित चार मतदान केंद्र साकारण्यात आली आहेत. नक्षत्र वाटिका, आयुर्वेदिक वनस्पती, देशी वृक्षांच्या बीजांचे वाटप करण्यात येणार आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटीलया आणि उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पी . के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर, एन सी आर डी स्टर्लिंग स्कूल भोसरी, ज्ञानप्रबोधिनी शाळा निगडी, डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज शाहूनगर येथे असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रावर संकल्पित हरीत चार मतदान केंद्र साकारण्यात आली आहेत.
हेही वाचा >>>अवकाळी पावसाचे चौथ्या टप्प्यातील मतदानावर सावट… कोणत्या लोकसभा मतदारसंघांना इशारा?
या उपक्रमामध्ये नक्षत्र वाटिका, १४२ आयुर्वेदिक वनस्पती, देशी वृक्षांच्या बीजांचे वाटप, मतदारांना प्रोत्साहनपूरक रोपांचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच २०२४-२५ आर्थिक वर्षात हरीतदूत स्वयंसेवक फळी निर्माण करून वृक्षारोपण कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त घोडके यांनी दिली आहे. हरित मतदान केंद्र उपक्रमात उद्यान अधिकारी प्रणव ढवळे आणि त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, माळी प्रशिक्षणार्थी यांनी योगदान दिले आहे.