पुणे : ई-हक्क प्रणालीच्या वापरासह फेरफार आणि अर्ज कमी दिवासांमध्ये निकाली काढण्यास विलंब करणाऱ्या तसेच साताबारा उतारा देण्यास अडचणी निर्माण करणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तराची तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसा स्पष्ट इशारा दिला असून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकाऱ्यांना पहिल्यांदाचा बोलाविण्यात आले होते.

आतापर्यंत प्रत्येक बैठकांना अप्पर जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तहसीलदार उपस्थित रहात होते. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यात येतो. तसेच सुरू असलेली कामे, नवीन उपाययोजना, रखडलेली विकासकामे, नागरिकांच्या अडचणी आदींचा आढावाही घेण्यात येतो. मात्र यावेळी जिल्ह्यातील १५४ मंडल अधिकाऱ्यांना प्रथमच बैठकीला बोलाविण्यात येऊन कामकाजाचे धडे देण्यात आले.

जिल्ह्यातील मंडल अधिकाऱ्यांना गतिमान पद्धतीने काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांना विविध फेरफार वेळेत मिळाले पाहिजेत. पाणंद रस्ते वाढविले पाहिजेत, ई-हक्क आणि ई-चावडीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. महसूल वाढविला पाहिजे. नागरिकांना तातडीने सातबारा मिळाले पाहिजे, असे यावेळी डुडी यांनी सांगितले.

गेल्या सहा महिन्यांचे पुनर्वसन संकलन रजिस्टर तयार करून सर्व अभिलेख ऑनलाइन उपलब्ध करून देणे या संदर्भातील सूचनाही मंडल अधिकाऱ्यांना करण्यात आली. बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार, मंडल अधिकारी काम करत आहेत की नाही याची तपासणी होणार आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तराची तपासणी करण्यात येईल. त्यामध्ये चुका आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे डुडी यांनी सांगितले.