पुणे : जिल्ह्यातील ६१ लहान मोठे साकव (पूल) धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला असून हे पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार पूल पाडण्याची कार्यवाही येत्या काही दिवसांत होणार आहे. दरम्यान, मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पुलाची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. त्याबाबतचे कार्यादेशही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. त्यानंतर जिल्ह्यातील ओढे, नाले, नदीवरील लहान मोठे पूल, साकव यांचे स्थापत्य लेखापरीक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते. तसेच, जे लहान-मोठे पूल धोकादायक असतील ते पाडण्यात येतील, असे डुडी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार विविध विभागांनी त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या पुलांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला होता.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि विभागीय रेल्वे विभागाचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्या अहवालातून ६१ पूल हे धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. हे पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.
‘कुंडमळा येथील पूल पडण्याच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी अशा धोकादायक पुलासंदर्भात काय करायचे याबाबत चर्चा झाली. त्या चर्चेनंतर जिल्ह्यातील धोकादायक पुलांची माहिती मागविण्यात आली. काही विभागांचे अहवाल आले असून, अद्याप बाकी काही विभागांचे अहवाल येणे अपेक्षित आहेत. प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात आजमितीला ६१ पूल धोकादायक आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या मालकीचे ५८, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन असे ६१ पूल पाडून टाकण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत’, असे डुडी यांनी सांगितले.
दरम्यान, या पुलांच्या ठिकाणी ‘धोकादायक पूल’ म्हणून फलक लावण्यात आल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या ८९ पुलांची दुरुस्ती
जिल्हा परिषदेच्या मालकीचे एकूण साडेपाच हजार पुलांपैकी ८९ पुलांची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे ७९४ पूल असून, त्यापैकी वाहतुकीस योग्य आणि संरचनात्मक स्थिती चांगली असलेले ७०१ पूल आहेत. सध्याच्या पुलांपैकी सुमारे ८९ पुलांची दुरुस्ती करण्याची शिफारस बांधकाम विभागाने केली आहे.