पुणे : मालमोटारीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा हात तुटला. हा तुटलेला हात पुन्हा जोडण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या केली आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले.

रमेश (नाव बदलले आहे) यांचा दिवे घाटातून दुचाकीवरून जात असताना मालमोटारीने धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला होता. त्यांचा उजव्या बाजूचा हाताचा वरचा भाग कापला गेला. त्यांना हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. तिथे डॉ. सुमित सक्सेना यांनी त्वरित त्यांच्यावर योग्य उपचार करणे चालू केले.

डॉक्टरांनी अतिशय दुर्मीळ व गुंतागुंतीची हस्तप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रमेश यांच्यावर यशस्वीपणे केली. सहा तासांच्या अवघड शस्त्रक्रियेमध्ये डॉ. सक्सेना आणि त्यांच्या पथकाने तुटलेला हात पुन्हा जोडण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण केले. रमेश यांना यशस्वी शस्त्रक्रियेनंतर काही आठवडे रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून ते पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. अद्याप आणखी काही हाडे तुटलेली असल्याने अजूनही ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्त्वाच्या संरचना जोडण्याचे आव्हान

या शस्त्रक्रियेबाबत बोलताना डॉ. सुमित सक्सेना म्हणाले की, शरीरातील रक्तवाहिन्या, नसा, स्नायू, स्नायूबंध आणि हाडे यांच्यासह सर्व महत्त्वाच्या संरचना सहा तासांच्या आत ठीक करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होती. ही शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात विच्छेदन करावे लागणार असल्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होता. शस्त्रक्रियेनंतरही रुग्णावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक होते.