पुणे : शहरात उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात कान दुखण्याच्या तक्रारीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कान नेमका कशामुळे दुखतोय हे कळत नसल्याने घरगुती उपाय केले जातात. त्यातून कानाचे दुखणे थांबण्याऐवजी आणखी वाढू लागते आणि कानाला गंभीर इजा होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे साध्या कानदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्याकडे लक्ष देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

याबाबबत कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अभिजीत मंत्री म्हणाले की, जिवाणू अथवा बुरशीच्या वाढीस पावसाळी हवा पोषक असते. यामुळे या काळात त्यांची झपाट्याने वाढ होते. त्यातून संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यातील हवेतील आर्द्रतेमुळे कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. अंघोळ करताना कानात पाणी जाते. अंघोळीनंतर कान कोरडा न केल्यास कानात जमा होणाऱ्या मळाला ओलसरपणा मिळतो. त्यातून कानात जिवाणू किंवा बुरशीची वाढ सुरू होते. यातून ओटीटीस मीडिया म्हणजेच मध्यकर्ण संसर्ग आणि बाह्यकर्णाचा संसर्ग होतो. यामुळे कानदुखी सुरू होते. कानातून तीव्र वेदना सुरू होतात. वेळीच डॉक्टरांना दाखवून उपचार घेतल्यास यातून लवकर आराम मिळतो.

अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. सुश्रुत देशमुख म्हणाले की, पावसात भिजल्यानंतर किंवा पोहताना कानात पाणी शिरल्याने कानाचा संसर्ग होऊ शकतो, विशेषतः जर कान व्यवस्थित कोरडे केले नाही तर हा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यात ॲलर्जी, सर्दी आणि सायनस सारखे संसर्गदेखील वाढतात. त्यामुळे कानात जळजळ होते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक असतो. कानांच्या स्वच्छतेचा अभाव, अस्वच्छ पाण्यात पोहणे किंवा जास्त वेळ इअरफोनचा वापर करणे यामुळे हा संसर्ग होतो.

लक्षणे कोणती?

– कान दुखणे

– कानात खाज सुटणे

– ऐकू न येणे

– कानातून स्त्राव बाहेर येणे

– ताप

– चक्कर येणे

– कानात आवाज येणे

काळजी काय घ्यावी?

– अंघोळ केल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान स्वच्छ कोरडे ठेवा.

– कानात इअरबड, कापसाचे बोळे किंवा बोटे घालणे टाळा.

– घरातील आर्द्रता कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करा.

– कानाची साधी तपासणी केल्याने संसर्गाचे वेळीच निदान शक्य होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कानाच्या संसर्गावर औषधांचे सेवन आणि कान स्वच्छ व कोरडे ठेवून उपाय करता येतात. याकडे दुर्लक्ष केल्यास ऐकू न येण्याची समस्या उद्भवते. पावसाळ्यात कान कोरडे आणि स्वच्छ ठेवणे अतिशय गरजेचे आहे. कानात वेदना, खाज सुटणे किंवा कानातून स्त्राव येत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.- डॉ. सुश्रुत देशमुख, कान-नाक-घसा तज्ज्ञ