पोट भरण्याचे एक साधन म्हणून प्राण्यांकडे आदीमकाळी माणसाने पाहिले. कालांतराने प्राण्यांनी ‘सोबती’ म्हणून घरात प्रवेश मिळवला, तो जीव लावण्याच्या अंगभूत गुणधर्मातून. प्राणी आवडतात म्हणून पाळले एवढय़ाच माफक अपेक्षेतून सुरू झालेला प्राणी पालनाच्या छंदाकडे बदलत्या गरजेनुसार एकटेपणावर उतारा म्हणून पाहिले जाऊ लागले. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे सध्या बाहेरील देशांमध्ये गाजणारे ‘डॉग्टर’ हे स्वरूप. डॉक्टरचे काम करणारे प्राणी ते ‘डॉग्टर’ असे थोडक्यात या संकल्पनेचे विश्लेषण होऊ शकेल. प्राण्यांच्या वापरातून उपचार करण्याचे किंवा उपचाराला हातभार लावण्याचे तंत्र अनेक ठिकाणी आता अधिकृतपणे वापरात येऊ लागले आहे. ‘अ‍ॅनिमल थेरपी’, ‘पेट पार्टनर’ अशा अनेक नामाभिधाने असलेल्या संकल्पनांचा भारतातही वापर होऊ लागला आहे.

कुणीही प्राणी पालक आपल्या पेटबरोबर भावनिकदृष्टय़ा जोडला जातो. केवळ प्रतिष्ठा म्हणून प्राणी पाळणारे पालकही या भावनिक नात्यापासून फार काळ दूर राहू शकत नाहीत, याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात. एखादा श्वान, मांजर प्रेमाने येऊन पायाला डोके घासतो, हळूच चाटतो त्यातून मिळणारा अनेकांना मानसिक आधार मिळतो. हाच मुद्दा ‘डॉग्टर’ या संकल्पनेशी जोडला गेला आहे.

बाजारपेठेचे स्वरूप

ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी ज्याप्रमाणे परिचारिका पुरवणाऱ्या संस्था आहेत. त्याच धरतीवर प्रशिक्षित प्राणी पुरवणाऱ्या संस्था परदेशात कार्यरत आहेत. कायमस्वरूपी प्रशिक्षित प्राणी पुरवण्याबरोबरच दिवसातील काही वेळ सोबत करण्यासाठीही प्राणी पुरवण्यात येतात. एखाद्या कंपनीतील कर्मचाऱ्याप्रमाणे या प्राण्यांची बडदास्त या कंपन्या ठेवतात. या शिवाय प्राण्यांना प्रशिक्षण देणे, थेरपीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्राण्यांची स्वच्छता राखणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अशा अनेक सेवा पुरवणारा व्यवसाय परदेशात तेजीत आहे. रुग्णाला असलेला आजार, त्याच्या इतर गरजा लक्षात घेऊन प्राण्यांची किंवा श्वान असल्यास त्याच्या प्रजातीची निवड केली जाते. अनेकदा प्राणी पाळायचे असतात मात्र त्यांची निगा राखणे शक्य नसते अशावेळी या संस्था पालकांच्या मदतीला धावून येतात. अनेकदा आपल्यानंतर पाळलेल्या प्राण्याचे काय, असा प्रश्न वृद्धांना पडतो, त्यावेळी पालकाच्या पश्चात त्याच्या प्रशिक्षित सहायक प्राण्यांची जबाबदारी संस्थांकडून घेतली जाते. त्यामुळे आता हळूहळू आपल्या आवडीनुसार घरी प्राणी ठेवण्याऐवजी ‘डॉग्टर’साठीही मागणी वाढत आहे.

भारतातही ओळख

भारतातही ‘अ‍ॅनिमल थेरपी’ची ओळख झालेली आहे. त्याचे व्यावसायिक रूप खूप मोठे नसले तरी प्राण्यांचा वापर उपचारांसाठी अनेक संस्था करतात. ‘अ‍ॅनिमल एंजल्स फाऊंडेशन’कडून अनेक ठिकाणी ही उपचार पद्धती राबवली जाते. पुण्यातील प्रसन्न ऑटिझम सेंटर, मुंबई विमानतळावर प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी श्वानांचा वापर करणे अशा सुविधा या संस्थेकडून देण्यात आल्या आहेत. भारतात मात्र प्राधान्याने श्वानांचाच वापर केला जातो. अनेक खासगी प्रशिक्षकही श्वानांना उपचार सहायक म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणाच्या स्वरूपाप्रमाणे शुल्क आकारले जाते.

‘डॉग्टर’ नेमके काय करतो?

प्राणी तणाव कमी करतात हे अनेक संशोधनानंतर सिद्ध झाले आहे. अशावेळी उपचार पद्धती म्हणून प्राण्यांचा वापर करावा का, त्याचा किती प्रमाणात उपयोग होतो अशा अनेक मुद्दय़ांवर संशोधकांमध्ये परस्पर विरोधी मतेही आहेत. मात्र ‘डॉग्टर’साठी मागणी वाढते आहे. तणावाच्या परिस्थितीत प्राण्यांच्या सहवासाने रुग्णांचा तणाव कमी होत असल्याचे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. एखाद्या उपचारासाठी रुग्णाचा सकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा असतो. त्यासाठीचे मनोबल प्राणी वाढवतात. त्यामुळे मानसिक समस्यांवरच्या उपचारांमध्येही प्राण्यांचा वापर केला जातो. महाविद्यालये, विद्यापीठे, कंपन्या, विमानतळ, रुग्णालये अशा अनेक ठिकाणी प्राण्यांचा वापर करण्यात येतो. ‘पोस्ट ट्रॉमॅटिक डिसॉर्डर’ वर उपचार करण्यासाठीही प्राण्यांचा उपयोग होत असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी’ अशा नावानेही ही उपचार पद्धती ओळखली जाते. श्वान लवकर प्रशिक्षित होतात. त्यामुळे प्राधान्याने श्वानांचा वापर करण्यात येतो. मात्र परदेशात मांजर, हॅमस्टर्ससारखे छोटे प्राणी, पक्षी, कासव हे देखील ‘डॉग्टर’चे काम करतात. एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सोबत म्हणून प्रशिक्षित श्वान पुरवण्याचा मोठा व्यवसाय परदेशांत उभा आहे.