पुणे : हिंजवडी तसेच खराडी, मगरपट्टा या परिसरातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची (आयटी) गैरसोय वाढल्याने स्थलांतराबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) या क्षेत्रांसाठी प्रामुख्याने डबलडेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर प्रथम आयटी क्षेत्रासाठी या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाने या कंपन्यांच्या परिसरात डबलडेकर बस सुरू करण्यासाठी येत्या आठवड्यात एका खासगी कंपनीच्या पथकाला आमंत्रित केले आहे. हे पथक पुण्यात पाहणी करण्यासाठी येणार असून पाहणीनंतर तातडीने प्रायोगिक तत्त्वावर काही मार्गांवर ही डबलडेकर बस चालविण्यासाठी सुरुवात करण्याचे नियोजन ‘पीएमपी’ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून खराडी, हडपसर, मगरपट्टा, हिंजवडी यांसारख्या ठिकाणी आयटी क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंजवडी शहत वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या समस्यांशी झुंझत आहे. आयटी कंपन्यांनी देखील स्थलांतर करण्याचा इशारा दिला असून पालकमंत्री अजित पवार यांनी या परिसरात तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय संस्थांना दिल्या.

आयटी क्षेत्रातील तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुलभता आणण्यासाठी पीएमपी प्रशासनाने गेल्या पाच वर्षांपासून डबलडेकर बस सुरू करण्यासंदर्भात नियोजन केले होते. अनेक प्रस्तावही बनवले, बैठकांवर बैठका झाल्या, मात्र त्यावर कुठलीच अंमलबजावणी झाली नाही. याबाबतचा प्रस्ताव धूळखातच पडला होता. अखेर वाहतूक कोंडीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी आयटी क्षेत्रात डबलडेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी नुकतीच संबंधित खासगी कंपनीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन पाहणी करण्यासाठी येत्या आठवड्यात पथकाला निमंत्रण दिले आहे. त्यानुसार पाच वर्षांनंतर सुचविलेल्या निवडक मार्गांवर या बसची प्रायोगिक स्तरावर चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली.

कशी आहे डबलडेकर बस?

ही बस १४ फूट आणि चार इंच असल्याने रस्त्यांवरील अडथळ्यांचा कुठलाही अडसर निर्माण होणार नाही. ही इलेक्ट्रिक आणि वातानुकूलीत बस असल्याने एकाच वेळी ७० प्रवासी बसून, तर ४० उभे राहून एकाच वेळी आरामदायी प्रवास करू शकणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित बस असल्याने देखभाल दुरुस्ती खर्चही परवडणारा असेल.

आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील सर्वाधिक कर्मचारी ये-जा करतात त्या मार्गावर डबलडेकर बस सुरू करण्याचे नियोजन आहे. येत्या आठवडाभरात संबंधित एका कंपनीचे पथक पुण्यात दाखल होईल. मार्गांचे सर्वेक्षण करून प्रायोगिक तत्त्वावर काही मार्गांवर सुविधा सुरू करण्यात यईल. त्यामुळे बसच्या फेऱ्या कमी करून रस्त्यावर कमीत कमी खासगी वाहने येईल, अशी सुविध उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. – नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल