पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात हातोडा आणि चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरला साळवे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून विजयकुमार साळवे असे फरार आरोपीचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात साळवे कुटुंब राहत होते. विजयकुमार आणि सरला या दोघांचा दोन वर्षांपूवी प्रेम विवाह झालेला आहे. दोघे ही भंडारा आणि गोंदिया येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, विजयकुमार हा पत्नी सरला हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. शनिवारी रात्री सरला झोपेत असताना पती विजयकुमारने तिच्या डोक्यात हातोड्याचा जोरदार प्रहार केला आणि चाकूने देखील वार केले असल्याचं समोर आलं आहे. ही घटना सोमवारी सकाळी समोर आली असून एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिक तपास पोलीस करत असून आरोपीचा शोध पोलीस घेतला जात आहे.