पुणे : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी (१४ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच लष्कर भागातील अरोरा टाॅवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर, तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेेंडे यांनी केले आहे.

मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी आरटीओ चौक, जहाँगीर रुग्णालयमार्गे इच्छितस्थळी जावे. आरटीओ चौकातून मालधक्क्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी ताडीवाला रस्ता, जहाँगीर रुग्णालयमार्गे जावे. मुख्य टपाल कार्यालयाकडून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी किराड चौक, नेहरु मेमोरिअल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

पुणे स्टेशनकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेसमार्गे इच्छितस्थळी जावे. बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. लष्कर भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात, विश्रांतवाडीतील मुख्य चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

ससून रुग्णालयात जाणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश

ससून रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिका, वाहनांसाठी शवागाराजवळील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे. मालधक्का चौक ते बोल्हाई चौक, बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जीपीओ, बोल्हाई चौक ते नरपतगिरी चौक, फोटो झिंको प्रेस उपरस्ता सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाहने लावण्यासाठी व्यवस्था

या भागात येणाऱ्या अनुयायांनी त्यांची वाहने एसएसपीएमएस प्रशालेचे मैदान (आरटीओ चौकाजवळ), पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ, ससून काॅलनी येथे लावावीत.

दांडेकर पूल परिसरात वाहतूक बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दांडेकर पूल परिसरातील वाहतूकबदल करण्यात येणार आहे. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सारसबाग, कल्पना हाॅटेल, ना. सी. फडके चौक, मांगीरबाबा चौक, जुना दत्तवाडी रस्ता, आशा हाॅटेल चौकमार्गे सिंहगड रस्त्याकडे जावे. सिंहगड रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आशा हाॅटेल चौकमार्गे दत्तवाडीत यावे. तेथून इच्छितस्थळी जावे.