सर्व प्रकारच्या प्रगतीचा पाया हा शैक्षणिक संस्था असतात. त्यामुळेच भारतातील शैक्षणिक संस्था अधिकाधिक सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी शुक्रवारी मांडले. शिक्षण, संशोधन आणि उद्योग ही साखळी निर्माण होत त्यातून प्रगती झाली पाहिजे. त्यात भारतातील युवा वर्गाची जबाबदारी मोठी असल्याचेही त्यांनी नमूद केले

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२१व्या पदवीदान समारंभात डॉ. रेड्डी बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, डॉ. दीपक माने, डॉ.विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. सुदर्शन कुमार, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक-उपकुलसचिव डॉ.अनिल लोखंडे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण ९६८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यापैकी पीएच.डी.च्या ७० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. रेड्डी म्हणाले, भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान, रस्ते वाहतूक, शिक्षण, औषध निर्माण अशा सर्वच क्षेत्रात गेल्या काही वर्षात प्रचंड प्रगती झाली आहे. पूर्वी भारत अन्य देशांच्या मार्गावर चालत होता. मात्र आता भारताच्या मार्गावर जगातील देश चालणार असून भारत जगाचे नेतृत्व करेल.
शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयांनी केलेल्या कामगिरीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक वेगळा ‘ब्रँड’ ठरला आहे. भविष्यात या विद्यापीठाची मान आणखी उंचावेल आणि त्यात विद्यार्थ्यांचा बहुमोल वाटा असेल असे डॉ. काळे यांनी सांगितले.