पुणे : ‘सुगम संगीत, कराओके आणि लावणीत रमलेल्या युवा पिढीमध्ये अभिजात शास्त्रीय संगीताची गोडी लावण्याचा प्रयत्न करीत आहे,’ अशी भावना कराड येथील स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या संचालक आलापिनी जोशी यांनी शनिवारी व्यक्त केली.
गानवर्धन संस्थेच्या वतीने ज्येष्ठ संगीतगुरू डाॅ. माधुरी डोंगरे यांच्या हस्ते आलापिनी जोशी यांना कृ. गो. धर्माधिकारी स्मृती संगीतसंवर्धक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी जोशी बोलत होत्या. गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, उपाध्यक्ष डॉ. नीलिमा राडकर, कोषाध्यक्ष सविता हर्षे, तात्यासाहेब नातू फाउंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू या वेळी उपस्थित होते.
जोशी म्हणाल्या, ‘स्वरनिर्झर संस्थेच्या माध्यमातून संगीत आणि संगीताला पूरक अशा विविध कलांचे प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांना फक्त परीक्षार्थी न बनविता त्यांची कला रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संगीत सभांचे आयोजन केले जाते. ज्ञानदानाचा हा वसा या पुरस्काराच्या प्रेरणेतून अधिक जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न राहील.’
‘अभिजात संगीताचे संवर्धन करणाऱ्या संस्थेतर्फे गुरू भगिनीला पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे,’ अशी भावना डोंगरे यांनी व्यक्त केली.
वासंती ब्रह्मे यांनी मानपत्राचे वाचन केले. सविता हर्षे यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात आलापिनी जोशी यांच्या गायनाची मैफल झाली. त्यांना मीनल नांदेडकर यांनी संवादिनीची, समीर मोडक यांनी तबल्याची तर साक्षी कालवडेकर आणि स्वागता पोतनीस यांनी तानपुऱ्याची साथसंगत केली.