आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी समाजाने उभे राहण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. आत्महत्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी आपल्यासमोरील प्रश्नांची हत्या करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी रविवारी व्यक्त केली.
परिवर्तन संस्थेतर्फे बीड जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणाऱ्या परिवर्तन आधार योजनेअंतर्गत मुळीक यांच्या हस्ते दहा विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, माजी पोलीस महासंचालक सुरेश खोपडे, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, विक्रमसिंह जाधवराव, संस्थेचे अध्यक्ष अभिजित घुले, उद्योजक आनंद भोसले या वेळी उपस्थित होते.
चीन दरवर्षी कृत्रिम पावसासाठी आर्थिक तरतूद करते. त्या धर्तीवर राज्य सरकारनेही कृत्रिम पावसासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करायला हवी, असे सांगून मुळीक म्हणाले, बियाणांची उपलब्धता, ट्रॅक्टर कंपन्या आणि मार्केटयार्ड या शेतमाल विक्रीशी संबंधित असलेल्या संस्थांनी आपल्यापरीने मदत केली तर शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.
कमी होत असलेली शेतजमीन, पावसाचा लहरीपणा, पीकपद्धतीतील बदल या प्रश्नांची सोडवणूक न करता आल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत याकडे लक्ष वेधून चौधरी म्हणाले, आधुनिक साधनांचा वापर करून शेती केली तरच शेतीमध्ये शाश्वतता येऊ शकेल. सुरेश खोपडे आणि पांडुरंग बलकवडे यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर ढगे यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Oct 2015 रोजी प्रकाशित
आत्महत्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी प्रश्नांची हत्या करावी – डॉ. बुधाजीराव मुळीक
आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणाऱ्या परिवर्तन आधार योजनेअंतर्गत मुळीक यांच्या हस्ते दहा विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली.
Written by दिवाकर भावे

First published on: 19-10-2015 at 03:18 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr mulik asks farmers to avoid suicide